दयानंद पाईकराव
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशन २००९ मध्ये तीन वेळा धनादेश देऊन ४२ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागातून काढले. परंतु मजुरांना ते पैसे न वाटता त्याचा अपहार केला. या प्रकरणी सदर पोलिसांनी निवृत्त झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तोलीराम फुलाजी राठोड (रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निवृत्त उपविभागीय अभियंत्याचे नाव आहे. ते सदर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात २५ ऑगस्ट २००९ ते ७ जून २०११ दरम्यान उप विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. हिवाळी अधिवेशन काळात ७ डिसेंबर २००९ ते १२ डिसेंबर २००९ या काळात त्यांनी तीन वेळा धनादेशाद्वारे २० लाख, २० लाख आणि २ लाख असे ४२ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागातून काढले. परंतु ही रक्कम मजुरांना न देता त्यांनी या रकमेचा आपल्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केला. या रकमेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभिलेखावर नोंद न करता ते खर्च केल्याचे दाखवून शासनाची ४२ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी झालेल्या चौकशीवरून कनिष्ठ अभियंता सचिन रामदास भोंगळ यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाकडे यांनी आरोपीविरुद्ध कलम ४०९ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.