लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारितील बगिच्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. नागपुरातील तब्बल ४३.५० टक्के उद्यानांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तर ६५ टक्के उद्यानांत शौचालयाची सोय उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांची अनेकदा गैरसोय होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. नागपूर शहरात मनपाच्या अखत्यारित किती उद्याने आहेत, यापैकी किती ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे, शौचालये किती ठिकाणी आहेत, तसेच उद्यानांत किती सुरक्षारक्षक आहेत, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपूर शहरात मनपाच्या अखत्यारित १३१ उद्याने आहेत. यातील केवळ ४६ उद्यानांमध्ये शौचालयाची सोय आहे. तर ५७ उद्यानांमध्ये साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शहरातील अनेक उद्यानांमध्ये सकाळ, सायंकाळ मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी असते. अशा स्थितीत मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे, ही आश्चर्यकारक बाब आहे.
सर्वाधिक सुविधा पॉश वस्तीतच
लक्ष्मीनगर, धरमपेठ झोनमध्ये शहरातील पॉश भागांचा समावेश होतो. याच दोन्ही झोनमध्ये सर्वाधिक उद्यानांमध्ये पिण्याचे पाणी व शौचालयांची सोय आहे. लक्ष्मीनगरमधील एकूण १४ उद्यानांत पिण्याच्या पाण्याची सोय असून पाच ठिकाणी शौचालये आहेत, तर धरमपेठेतील १५ उद्यानांत पिण्याच्या पाण्याची सुविधा असून ११ ठिकाणी शौचालये बांधण्यात आली आहेत.
झोननिहाय सुविधा असलेली उद्याने
झोन : पिण्याचे पाणी : शौचालये
लक्ष्मीनगर : १४ : ५
धरमपेठ : १५ : ११
हनुमाननगर : ४ : ४
धंतोली : ७ : ४
नेहरूनगर : ३ : २
गांधीबाग : ४ : ५
सतरंजीपुरा : ६ : ६
लकडगंज : ३ : २
आशीनगर : ९ : ६
मंगळवारी : ८ : १
५१ टक्के उद्यानांत सुरक्षारक्षक नाहीत
नागपुरातील काही उद्यानांमध्ये दुपारी तसेच सायंकाळनंतर अनेक समाजकंटक येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मात्र, मनपाने ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही. शहरातील ६७ म्हणजेच ५१ टक्के उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. १३१ उद्यानांसाठी ११५ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे काही उद्यानांंत तीन किंवा त्याहून अधिक सुरक्षारक्षक आहेत, तर २७ उद्यानांची सुरक्षा केवळ एकाच सुरक्षारक्षकाच्या भरवशावर आहे.