लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भवानी माता मंदिर पारडी परिसरात धान्याची काळाबाजारी करणाऱ्या कुख्यात आकरे बंधूंकडे गुरुवारी दुपारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी तेथून सरकारी धान्याची ४४२ पोती तसेच ट्रक जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या धान्यात गहू, तांदूळ आणि मक्याचा समावेश आहे. तर, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिनेश आणि प्रदीप रामभाऊ आकरे तसेच जागोजी ढोबळे, बन्शी राऊत आणि अण्णा ऊर्फ वैभव जितेंद्र रेवतकर यांचा समावेश आहे.
रेशनच्या धान्याच्या काळ्याबाजारात अनेक दिवसांपासून गुंतलेल्या आकरे बंधूंचे मोठे नेटवर्क आहे. रोज लाखोंच्या धान्याची काळाबाजारी करणाऱ्या या टोळीची माहिती कळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निलोत्पल तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनोद पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी दुपारी छापा मारला. यावेळी आकरेने त्याच्या पारडीतील मोठ्या गोदामातून सरकारी धान्य बाहेर पाठविण्यासाठी तयारी सुरू होती. ट्रकमध्ये धान्याची पोती ठेवली जात होती. पोलिसांना तेथे २२० पोती गहू, १५० बोरी तांदूळ आणि मक्का भरलेली ७२ पोती आढळली. या धान्याची अंदाजे किंमत ३ लाख, ७० हजार रुपये आहे. हे धान्य आणि ट्रक पोलिसांनी जप्त केला. युनिट पाचचे वरिष्ठ निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी, नायक पंकज लोडे, विजय यादव, सचिन नांदाडे, विलास, चिंचूलकर, प्रफुल्ल पारधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
गरिबाच्या हक्काचे अन्न बाजारात विकणाऱ्या या गोरखधंद्यात आकरे बंधूंसह शहरातील अनेक भामटे सहभागी आहेत. अनेक व्यापाऱ्यांशी आणि पोलिसांशी सलगी असणाऱ्या दलालांशीही त्यांचे लागेबांधे असल्याने अनेकदा पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देऊन मोठ्या भामट्यांना कारवाईपासून दूर ठेवले जाते. यावेळी असाच प्रकार होतो की, पोलीस गोडबोल्या दलालांना दूर ठेवून त्या भामट्यांची मानगूट पकडतात, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.