उमरेड : उमरेड तालुक्यात शेवटच्या टोकावर वसलेल्या बेला येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी केली जात आहे. शासनाने नुकतीच ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली. बेला ते उमरेड ४५ किलोमीटरचे अंतर आहे. शिवाय गंभीर रुग्णांसाठी नागपूरचीही वाट बेला परिसरातील नागरिकांना धरावी लागत असते. कोविड लसीकरणासाठी करावी लागणारी प्रक्रिया, त्यानंतर लसीकरण आणि लसीकरण आटोपल्यानंतर अर्धा तास देखरेखीखाली राहावे लागते. यामुळे लसीकरणाची एकूणच प्रक्रिया लक्षात घेता, बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाची सुविधा तातडीने सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ज्येष्ठांसह अनेकांसाठी उमरेडचा लांबपल्ल्याचा प्रवास अधिकच कठीण ठरणारा आहे.
या गावासाठीही मोलाचे
अप्पर तहसीलदार कार्यालय असलेल्या बेला गावाची लोकसंख्या ८,७३६ आहे. येथे १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. सोबतच विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि जिल्हा परिषदेची शाळा असा शैक्षणिक विस्तार येथे आहे. कळमना (बेला), सालईराणी, दहेली, आष्टा, सावंगी खुर्द, सावंगी बुजुर्ग, शेडेश्वर आदी मोठी गावेसुद्धा बेला गावालगत आहेत. यामुळे बेला येथे कोविड लसीकरणाची सुविधा या गावांसाठीसुद्धा अतिशय मोलाचे ठरणार आहे.
रिक्त पदे कधी भरणार?
बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अवतीभवतीच्या गावखेड्यातील बहुसंख्य गावकरी उपचारासाठी येतात. नागपूरच्या एम्स हॉस्पिटलसोबत संलग्नित असलेल्या या केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी, केवळ एक परिचर अशी सुविधा आहे. परिचराच्या तीन जागा रिक्त आहेत. आरोग्य सहायकाची दोन पदे रिक्त आहेत. यामुळे येथील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली जात आहे.
आधी केंद्रावर मग उपकेंद्रावर
उमरेड तालुक्यात बेला, सिर्सी, मकरधोकडा आणि पाचगाव अशी एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सोबतच २५ उपकेंद्राचे जाळे तालुक्यात पसरले आहे. यामुळे कोविड लसीकरणाची मोहीम आधी केंद्रावर आणि मग उपकेंद्रावर सुरू करण्यात यावी, असाही सूर उमटत आहे.