लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या ॲन्टी हॉकर्स ॲन्ड क्राईम डिटेक्शन टीमने गोरखपूर-सिकंदराबाद विशेष रेल्वेगाडीतून दारूच्या ४५० बॉटल जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲन्टी हॉकर्स ॲन्ड क्राईम डिटेक्शन टीमचे उपनिरीक्षक सचिन दलाल, भारत माने, नरेंद्र चौहान, श्याम झाडोकर यांनी बुधवारी पहाटे ४.०५ वाजता गोरखपूर-सिकंदराबाद विशेष रेल्वेगाडीची पाहणी केली. यात एस ७ कोचमध्ये तीन बॅग बेवारस अवस्थेत आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता या बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यानंतर या बॅग आरपीएफ ठाण्यात आणून पंचासमक्ष तपासणी केली असता, बॅगमध्ये ३८,२५० रुपये किमतीच्या दारूच्या ४५० बॉटल आढळल्या. कागदोपत्री कारवाई करून जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.