लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर – अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने गुरुवारी शहरातील महाविद्यालयांमधील रिक्त जागांची यादी जारी केली. यानुसार नागपुरात कनिष्ठ महाविद्यालयात एकूण ४५ हजार ७१६ जागा रिक्त आहेत. पहिल्या फेरीत केवळ १३ हजार ४५४ जागा भरू शकल्या.
पहिल्या फेरीत विज्ञान शाखेच्या सर्वाधिक २० हजार २३७ जागा रिक्त होत्या, तर वाणिज्य शाखेत १४ हजार ५२ जागा रिकाम्या राहिल्या. दोन्ही शाखांच्या तुलनेत कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी राहिली. त्यामुळे तेथील ८ हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या. दुसऱ्या फेरीत जागा भरतील अशी शिक्षण विभागाला अपेक्षा आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे महाविद्यालय मिळूनदेखील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही.
विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या फेरीत १८ हजार १३२ विद्यार्थ्यांना मेरिटनुसार महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले होते. मात्र त्यातील केवळ १३ हजार ६४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. १ हजार ४१ विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्यांतर्गत प्रवेश घेतला.
दुसऱ्या फेरीत जागा रिक्त राहू नये यासाठी महाविद्यालयांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता, अनेक महाविद्यालयात विज्ञान अभ्यासक्रम संचालित केले जात आहेत.
पहिल्या फेरीतील स्थिती
शाखा - एकूण जागा - रिक्त जागा
कला - ९,९६० - ८,०५५
वाणिज्य - १८,००० - १४,०५२
विज्ञान - २७,३८० - २०,२३७
एमसीव्हीसी- ४,१३० - ३,३७२