लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करचोरीशी संबंधित गोपनीय माहितीच्या आधारे वस्तू व सेवाकर गुप्तचर महासंचालक, नागपूर झोनल युनिटने गेल्या काही दिवसात रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांविरुद्ध कठोर तपासणी मोहीम राबविली होती. या कंपन्यांमध्ये नागपूर विभागात मेसर्स ग्रीन सिटी बिल्डर्स, मेसर्स कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर, मेसर्स परदेशी कन्स्ट्रक्शन प्रा.लि., मेसर्स कुकरेजा एम्बेसी, मेसर्स जेडी बिल्डकॉन प्रा.लि. आणि नाशिक क्षेत्रातील संकलेचा कन्स्ट्रक्शन प्रा.लि. व मेसर्स संकलेचा कन्स्ट्रक्शन्सचा समावेश होता.या तपासणी मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांसह डिजिटल डाटाचे विश्लेषण करण्यात आले. तपासणीदरम्यान आतापर्यंत जीएसटी व सेवा कराच्या निर्धारित रकमेत १०.४० कोटींची नोंद करण्यात आली. यापैकी रिअल इस्टेट कंपन्यांकडून आतापर्यंत ४.५२ कोटी वसूल करण्यात आले. यामध्ये मेसर्स ग्रीन सिटी बिल्डर्सने निर्धारित २ कोटी रुपये करातून सध्या ५८.१७ लाख रुपये, परदेशी कन्स्ट्रक्शन प्रा.लि.ने १.३५ कोटी रुपये निर्धारित करापैकी १५ लाख रुपये, मेसर्स कुकरेजा एम्बेसीने ४.८६ कोटी रुपयांच्या निर्धारित करापैकी १७.५० लाख रुपये (३.४० कोटी रुपये आयटीसी सेटऑफच्या स्थितीत) आणि मेसर्स जेडी बिल्डकॉन प्रा.लि.ने ४० लाख रुपयांच्या निर्धारित करापैकी २१ लाख रुपये भरले आहेत. तपासणी मोहीम अजूनही सुरू असून अन्य संबंधित करदात्यांकडून देवाणघेवाणचे आकडे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.