नागपूर/वर्धा : वर्ध्याच्या वडनेर येथील एका व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्याकडून बंदुकीच्या धाकावर ४.५२ कोटी रुपये लुटणाऱ्या आरोपींना नागपुरातून अटक करण्यात आली आहे. हे आरोपी नागपुरात पोलिस बनून लाल दिव्याच्या वाहनात आले होते. वर्धा पोलिसांच्या माहितीवरून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना सिनेस्टाइल अटक केली. आरोपींनी या दरोड्याचा प्लॅन तुरुंगातच रचला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून २.३६ कोटी रुपये जप्त केले आहेत.
अलीम शेख, ब्रिजपालसिंग ठाकूर, दिनेश वासनिक अशी आरोपींची नावे आहे. तर राजा ऊर्फ विजय मालवीय याच्यासह तीन साथीदार फरार आहेत. वर्धा येथील पोहना, वडनेर येथे बुधवारी रात्री ही दरोड्याची घटना घडली. गुजरातचे रहिवासी कमलेश शहा हे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे कार चालक म्हणून अठेसिंग सोलंकी हा काम करतो तर नितीन जोशी कार्यालय सांभाळतात. शहा यांना त्यांच्या व्यवसायानिमित्त नागपुरात ये-जा करावी लागते. ६ सप्टेंबर रोजी शहा यांनी सोलंकीला नितीनकडून पैसे घेऊन हैदराबादला जाण्यास सांगितले.
सोलंकी बुधवारी संध्याकाळी अरविंद पटेल नावाच्या साथीदारासह ४.५२ कोटी रुपये घेऊन कारमधून हैदराबादला निघाला. रामटेकच्या एका साथीदाराने आरोपींना अगोदरच याची टीप दिली होती. आरोपींनी शहा यांच्या गाडीचा क्रमांकही मिळवला होता. पोलिस असल्याचे भासवून आरोपींनी दरोडा टाकण्याचा 'प्लॅन' केला होता. योजनेनुसार ते कार क्रमांक एमएच ३१ ईक्यू ०९०९ मध्ये बसले व त्यांनी कारचा पाठलाग सुरू केला. लुटण्यासाठी ते निर्जन परिसर शोधत होते. वडनेरच्या पोहना येथील आरोपींनी सायरन वाजवत त्यांनी सोलंकीच्या कारला ‘ओव्हरटेक' केले. सोलंकीने पोलिस असल्याचे समजून गाडी थांबवली. आरोपींकडे पोलिस कर्मचारी वापरत तशी प्लास्टिकची छडी होती. ते पाहून सोलंकीला ते पोलिस असल्याची खात्री पटली.
आरोपी दार उघडून सोलंकीच्या गाडीत बसले. सोलंकी आणि पटेलला आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांनाही कारमधून बाहेर काढून कारसह पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी नागपूर पोलिसांना माहिती दिली. गुन्हे शाखेसह सर्वांना सतर्क करण्यात आले. उपायुक्त मुमक्का सुदर्शन आणि आणि राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली रात्रीच कारचे 'लोकेशन' घेऊन आरोपींना अटक करण्यात आली. अलीम, ब्रिजपाल आणि दिनेश यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून २.३६ कोटी रुपये जप्त करण्यात आले.
तुरुंगात रचला प्लॅन
तुरुंगात असताना ही योजना बनवण्यात आल्याची माहिती आरोपींनी दिली. फरार आरोपी राजा मालवीयने ही रक्कम तुलसीनगर, शांतीनगर येथे राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या घरात लपवून ठेवली होती. पोलिसांनी तेथे छापा टाकून ७५ लाख रुपये जप्त केले. दिनेश वासनिक याच्यावर खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच जामिनावर आला आहे.
दहा पथके रवाना, दोन आरोपी 'रडार'वर
वर्धेचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी बुधवारी रात्री बटनेर पोलिस ठाणे गाठून घटनास्थळाची पाहणी केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना सूचना देत जवळपास दहा पथके आरोपीच्या शोधार्थ पाठविली. पोलिस पथकांनी आरोपींचा हिंगणघाट, नागपूर, नागपूर ग्रामीण, यवतमाळ आदी शहरांत कसून शोध घेतला. पाचपैकी तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपीही पोलिसांच्या रडारवर असून त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याचे हसन यांनी लोकमतला सांगितले.