नागपूर : ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली ५८ कोटींची फसवणूक करणारा बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन याच्या लॉकरमधून गुन्हे शाखेने ४.५४ कोटींची रोकड आणि सोने-चांदीचा ऐवज जप्त केला आहे. अधिकृत लॉकर्समधून रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आल्याने सोंटूच्या बेनामी लॉकर्समध्येही कोट्यवधी रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांकडून त्याचे बेनामी लॉकर्स शोधण्यात येत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोंटूचेही नागपुरात पाच लॉकर असून, ते इतर व्यक्तींच्या नावाने होते. हे लॉकर्स खाजगी बँकांशी संलग्न आहेत. या लॉकर्समध्ये सोनूने ठेवलेली रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. सोंटूविरुद्ध गुन्हा दाखल होऊन १२ दिवस उलटले असून, तो अद्यापही दुबईतच आहे. अटक टाळण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सोंटूला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळणार नाही, असा विश्वास पोलिसांना आहे.
सोंटूच्या फसवणुकीचे भक्कम पुरावे पोलिसांकडे आहेत. पीडित व्यावसायिक त्याच्या ऑनलाइन गेमिंगमध्ये अडकल्याने उद्ध्वस्त झाला आहे. सोंटूच्या जाळ्यात अडकून पीडित व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोंटूच्या तावडीत अडकल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. बदनामीच्या भीतीपोटी ते समोर आलेले नाहीत. दरम्यान, याअगोदर पोलिसांनी सोंटूच्या गोंदिया येथील घरातून १६.८९ कोटी रुपये रोख, १२ किलो ४०३ ग्रॅम सोने आणि २९४ किलो चांदी जप्त केली होती. त्याची किंमत २६.४० कोटी रुपये होती. आता लॉकरमध्ये सापडलेली रोकड आणि सोने-चांदीमुळे ही रक्कम ३० कोटी ९४ लाखांवर पोहोचली आहे. नागपूर पोलिसांच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्तीची ही पहिलीच वेळ आहे.