लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर, बुटीबोरी : नागपूर तालुक्यात वारंगा गावातील कोंबड्यांचे नमुने बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने तिथे एक किलोमीटर परिसरातील पक्षी नष्ट करण्याची कारवाई मंगळवारी सायंकाळी सुरू झाली. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या सोबतच गडचिरोली शहरातही २५ कोंबड्यांचे नमुनेही पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे तिथेही एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम बुधवारी राबविली जाणार आहे.
बुटीबोरीजवळ असलेल्या वारंगा येथील चेतना फार्म हाउसवरील २३ कोंबड्या गेल्या आठवड्यात मृत आढळल्या होत्या. १४ जानेवारीला त्यांचे नमुने पुणे व त्यानंतर भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल सोमवारी रात्री १०.३० वाजता पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला. त्यात कोंबड्या पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनंतर तातडीने परिसरात रेड अलर्ट जाहीर करून कोंबड्या मारण्याचा निर्णय झाला. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजूषा पुंडलिक यांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता पथक गावात पोहोचले. त्यानंतर कोंबड्या नष्ट करण्याची कारवाई सुरू झाली. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विभागाचे अधिकारी, रॅपिड रिस्पॉन्स टीम कारवाईच्या स्थळी उपस्थित होते. या परिसरातील सर्व पक्षी, पक्ष्यांची अंडी नष्ट करण्याबरोबरच मांस विक्रीची दुकानेही ताबडतोब बंद करण्यात आली. विभागाने घेतलेल्या आढाव्यात एक किलोमीटर परिसरात ४६० पक्षी असल्याची माहिती आहे.
अहवाल येताच नागपूर येथून जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे चार शीघ्र कृती दल व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सकाळी ११ वाजता दाखल झाले होते. गावातील सर्व कोंबड्या मालकांना त्यांच्या मालकीच्या कोंबडी व अंड्यांचा मोबदला शासनाकडून दिला जाईल, असे सांगण्यात आले. मोहिमेदरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. उशिरापर्यंत मोहीम सुरूच होती. नागरिकांनी मोहिमेला सहकार्य केले असून, परिसरातील सर्व पक्षी नष्ट करेपर्यंत ही मोहीम रात्री उशिरापर्यंत चालविली जाईल, असे डॉ. पुंडलिक यांनी सांगितले.
..गडचिरोलीतही रेड अलर्ट
गडचिरोली शहरातील फुले वॉर्डातील २५ कोंबड्यांचे नमुनेही बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आले आहेत. १४ जानेवारीला तेथील २५ कोंबड्या मृत झाल्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचाही अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. यामुळे तेथेही पक्षी नष्ट करण्याची मोहीम बुधवारी राबविली जाणार आहे. फुले वॉर्ड हा शहराचाच एक भाग असून, दाट लोकवस्तीचा आहे. सर्व कोंबड्या घरगुती पाळीव असून, एक किलोमीटर परिसरातील एकूण कोंबड्यांचा आकडा अद्याप हाती आलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना बुधवारी निघणार असून, त्यानंतर कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाने मोहिमेच्या दृष्टीने सर्व तयारी केली असून, पथक सज्ज आहे. एक किलोमीटर परिसरात दवंडी देण्यात आली असून, नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले आहे.
...
..अशी आहे पद्धत
या मोहिमेत पक्षी नष्ट करण्यासाठी सोडियम फिनॉल बार्बिटोन हे औषध वापरले जाते. या औषधाच्या ८० ग्रॅमच्या गोळ्या किंवा औषधाचे ५५ लीटर पाण्याचे मिश्रण वापरले जाते. गोळी खाल्ल्यानंतर किंवा मिश्रणाच्या फवारणीनंतर पक्षी बेशुद्ध होऊन मृत पावतो. मृत पक्षी पोड्यामध्ये भरून त्यांना सामूहिकपणे खड्ड्यात पुरले जाते. आधी चुना टाकून त्यानंतर पक्षी टाकले जातात. त्यावर माती लोटून खड्डा बुजवला जातो. अन्य प्राण्यांनी तो उकरू नये यासाठी वर काट्या टाकून माहितीदर्शक फलक लावला जातो.