नागपूर : संपूर्ण विदर्भाला हादरविणाऱ्या बाळ खरेदी-विक्रीच्या रॅकेटची पाळेमुळे विविध राज्यांतदेखील पसरली होती. या रॅकेटमध्ये पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांत ११ गुन्ह्यांची नोंद केली होती व पाच गुन्ह्यांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या खरेदी-विक्री टोळीसंदर्भात विधान परिषदेत श्रीकांत भारतीय यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
ऑक्टोबर महिन्यात आठ महिन्यांच्या बाळाच्या अपहरणानंतर या रॅकेटचा भंडाफोड झाला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत अनेक नवनवीन खुलासे समोर आले. या रॅकेटमध्ये एका तथाकथित डॉक्टरचादेखील सहभाग असल्यामुळे या रॅकेटची व्याप्ती फार मोठी असल्याची बाब स्पष्ट झाली. या टोळीने गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतदेखील निपुत्रिक दांपत्यांना बाळांची विक्री केली होती. त्यातही अनेकांना दत्तक प्रक्रियेअंतर्गत बाळ दिल्याची थाप मारली होती व त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते. या प्रकरणाची पोलिसांकडून अद्यापही पाळेमुळे खणण्यात येत असून गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत विविध पोलिस ठाण्यांत एकूण ११ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील सहा गुन्ह्यांचा तपास अजूनही सुरू असून रॅकेटच्या सूत्रधारांकडून आणखी बाळांची विक्री झाली का याचा शोध घेत आहेत.
४७ आरोपींना अटक
या प्रकरणात नेमक्या किती आरोपींना अटक झाली याबाबत पोलिसांकडून स्पष्ट आकडे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या प्रजापती दांपत्यापासून पोलिसांनी या रॅकेटमध्ये आतापर्यंत ४७ आरोपींना अटक केली आहे. यात सूत्रधार श्वेता खान, सचिन पाटील, मकबूल खान, राजश्री सेन या आरोपींना पोलिसांनी अटक केली होतीच. शिवाय बाळांची खरेदी करणाऱ्या दांपत्यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात आणखी एजंट्स असण्याची शक्यता असून त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
बनावट डॉक्टर बनलेल्या श्वेताविरोधात गुन्ह्याचे कलम वाढविले
श्वेताने डॉक्टर असल्याची बतावणी करीत, बालाघाट येथे एक चाइल्ड क्लिनिक थाटले होते. त्या माध्यमातून तिने बाळाच्या विक्रीचा गोरखधंदा सुरू केला होता. तिच्यावर चार गुन्हे दाखल झाले होते. तपासादरम्यान तिने एमबीबीएस पदवी नसतानादेखील बोगस क्लिनिक थाटल्याची बाब समोर आली होती. पोलिसांनी तिच्याविरोधात रुग्णांचे जीव धोक्यात आणल्याबाबत कलम ४१९ सह ३३ (१) महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्टअंतर्गत गुन्ह्याचे कलम वाढविले.