कामठी : कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ९ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. यात बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागा करिता ४७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.
मंगळवारी सेवा सहकारी मतदार संघातील ११ जागे करिता २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. एकूण ४२१ मतदार या गटातील संचालकांची निवड करतील. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या ४ जागांसाठी १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील ४६७ मतदार ४ संचालकांची निवड करतील. व्यापारी अडते मतदारसंघातील २ जागा करिता चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी ८९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मापारी-हमाल मतदार संघाच्या एका जागेसाठी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीवर केदार गटाचे गत नऊ वर्षांपासून वर्चस्व आहे. सभापतीपदी हुकुमचंद आमधरे तर उपसभापतीपदी प्रमोद बाबा महल्ले पाटील होते. यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपाने ही दंड थोपाटले आहेत. येथे तिसरी आघाडी म्हणून प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार घुले, कामठी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख छत्रपाल करडभाजने यांच्या मार्गदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. विद्यमान सभापती हुकुमचंद आमधारे, उपसभापती प्रमोद बाबा महल्ले पाटील, रामकृष्ण प्रगट, कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व खैरी ग्रामपंचायतचे सरपंच मोरेश्वर कापसे, सोपान गभने, लोनखैरीचे सरपंच लीलाधर भोयर, सुरादेवीचे सरपंच सुनील दूधपचारे, पवनगावच्या सरपंच नेहा किरण राऊत, वारेगावचे माजी सरपंच देवराव पांडे, टेमसना ग्रामपंचायतचे सरपंच अनिकेत शहाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गोसावी, सहायक अधिकारी बी.के. कासारे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटी तारीख ३० सप्टेंबर आहे. यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.