लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : पाेलिसांनी वारेगाव (ता. कामठी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. यात आठ गुरांची सुटका करण्यात आली असून, ४ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. ६) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना खापरखेडा परिसरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी वारेगाव शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. मात्र, पाेलिसांना पाहताच सीजी-०७/बीबी-१३०७ क्रमांकाच्या वाहनचालकाने मध्येच वाहन थांबविले व ते साेडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. ही बाब लक्षात येताच पाेलिसांनी त्या वाहनाची झडती घेतली. त्यात त्यांना १० जनावरे काेंबली असल्याचे तसेच त्यातील दाेन जनावरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे लक्षात आले.
ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी वाहनातील आठ गुरांची सुटका केली. शिवाय, मृत गुरांची विल्हेवाट लावून वाहन ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये चार लाख रुपये किमतीचे वाहन आणि ७० हजार रुपयांची जनावरे असा एकूण ४ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पळून गेलेल्या वानचालकास लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही पाेलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक निमगडे करीत आहेत.