नागपूर : रेल्वेने प्रवास करताना योग्य दराचे तिकीट खरेदी करून तसेच आपल्या जवळील सामानाची बुकिंग करणे गरजेचे आहे. परंतु, अनेक प्रवासी तिकीटच खरेदी करीत नाहीत, तर काहीजण आपल्या जवळील सामानाची बुकिंग करणे टाळतात. अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या वर्षभरात मोहीम राबवून तब्बल ४.७२ लाख फुकट्या प्रवाशांची धरपकड केली. त्यांच्याकडून दंडापोटी ३१.२३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. अभियानात विनातिकीट ४.७० लाख प्रवाशांकडून ३१.१५ कोटी दंड वसूल करण्यात आला. मोहिमेत १२८८ प्रवासी जनरल, तसेच स्लिपर क्लासचे तिकीट खरेदी करून स्लिपर, तसेच एसी कोचने प्रवास करीत असल्याचे आढळले. त्यांच्याकडून दंडापोटी ६.१८ लाख रुपये वसूल करण्यात आले, तर सामानाची बुकिंग न करणाऱ्या ५३१ प्रवाशांकडून १.८१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य दराचे तिकीट खरेदी करून, तसेच सामानाची बुकिंग करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.