लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आतापर्यंत ‘ड’ जीवनसत्त्वाचा फायदा शरीरातील कॅल्शियमसाठी होतो, असा समज होता, परंतु या जीवनसत्त्वाचा उपयोग नुसताच हाडाशी नसून शरीरातील प्रत्येक पेशींना याची आवश्यकता असते. मेंदूपासून ते हृदयापर्यंतच्या ३६ अवयवांना योग्य प्रमाणात हे जीवनसत्त्व मिळाले नाही तर ते पूर्ण क्षमतेने कार्य करीत नसल्याचे समोर आले आहे. असे असताना ४८ टक्के ९ ते ११ वयोगटातील मुलींमध्ये तर ७६ टक्केगर्भवती महिलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती भारतीय बालरोग संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी दिली. भारतीय बालरोग संघटनेच्यावतीने रविवारी लहान मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.डॉ. जोग म्हणाले, जन्मलेल्या प्रत्येक बाळाला रोज ४०० युनिट ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज भासते. मातेचा दुधात हे जीवनसत्त्व असते. परंतु एक लिटर दुधात केवळ ४० युनिट एवढेच असते, आणि दिवसभरात एक बाळ जास्तीत जास्त पाऊण लिटरच्यावर दूध घेत नाही. यामुळे बाळाच्या विकासासाठी आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज मातेच्या दुधातून भागत नाही. यामुळे हाडांसह इतर अवयवांची क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी बाहेरून ‘ड’ जीवनसत्त्व पुरविणे आवश्यक आहे. प्रतिकार शक्तीसाठीही या जीवनसत्त्वाची गरज महत्त्वाची असते.
९० टक्के जीवनसत्त्व सूर्यप्रकाशातून मिळतेडॉ. जोग म्हणाले, ९० टक्के जीवनसत्त्व सूर्यप्रकाशातून मिळते. परंतु आपल्याकडे मुले असो किंवा मोठ्या व्यक्ती घराबाहेर पडताना आपण सर्व अंग झाकून घेतो. काही जण कारच्या सर्व काचा बंद करून घराबाहेर पडतात आणि कार्यालयापासून ते शाळापर्यंत बहुसंख्य सर्वच ठिकाणी उन्हापासून दूर राहतात. परिणामी, दिवसेंदिवस प्रत्येकांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते.लहान मुलांना ४०० तर मोठ्यांना १००० युनिटची गरज पडतेजन्मलेल्या बाळांना रोज ४०० युनिट, १० ते १६ वर्षापर्यंत साधारण ६०० युनिट तर मोठ्या व्यक्तींना १००० युनिट ‘ड’ जीवनसत्त्व मिळायला पाहिजे. या जीवनसत्त्वाची पातळी तपासताना एक मिलीला ३० मॅमोग्रॅम ठेवणे आवश्यक असते. ही जर कायम राहिली तरच या जीवनसत्त्वाचा फायदा मिळतो. प्रत्येक पेशीला याचा फायदा होतो, असेही डॉ. जोग म्हणाले.
प्रोस्टेड कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी फायदा होतोडॉ. जोग म्हणाले, योग्य प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व मिळाले तर मधुमेहासोबतच प्रोस्टेडचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या ग्रंथीचा कॅन्सर दूर ठेवण्यास मदत होते. या शिवाय नैराश्याचे, स्किझोफ्रेनियाचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
३२ टक्के डॉक्टरांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता३२ टक्के डॉक्टरांमध्ये व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता आढळून येते. हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांमध्ये ६० टक्के, गर्भवती महिलांमध्ये ७६ टक्के या जीवनसत्वाची कमतरता आढळून येते. यामुळे या जीवनसत्वाला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.
‘ड’ जीवनसत्त्वासाठी हे करा
- सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या उन्हात साधारण १५ ते ३० मिनिटे रहा.
- शरीराचा जास्तीत जास्त भागावर ऊन पडेल याकडे लक्ष द्या.
- लहान मुलांना सूर्यप्रकाशात आंघोळ घाला.
- शाळा संचालकांनी या वेळेत पिटी किंवा खेळांचे तास घ्यायला हवेत.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधाच्या रूपातही हे जीवनसत्त्व घ्यावे.