नागपूर : स्वत:ची कार, जीप तसेच अन्य वाहने आपल्याला पाहिजे त्या वेळी, पाहिजे त्या ठिकाणी पोहचवून देत असली तरी या वाहनांना ठिकठिकाणी पोहचवून देण्याची कामगिरी रेल्वेगाडी करते. मध्य रेल्वेने गेल्या पाच महिन्यात अशा प्रकारे कार, जीप, एम्बुलन्ससह वेगवेगळ्या ४८,५०० वाहनांना ठिकठिकाणी पोहचवून दिले आहे.
धावत्या जगात टिकून राहण्यासाठी आणि वेळीच पाहिजे त्या ठिकाणी पोहचविण्यासाठी स्वत:चे वाहन असणे आवश्यक आहे. प्रारंभी चैनीची आणि प्रतिष्ठेचे साधन मानले जाणारी कार, जीप आता दैनंदिन जीवनातील गरजेचे आवश्यक साधन बनले आहे. चैनीचे आणि प्रतिष्ठेचे साधन म्हणून मोजकी मंडळी कोट्यवधींची वाहने खरेदी करून वापरतात. तर, समाजातील मध्यमवर्गीय मंडळी दगदगीच्या आणि धावत्या जिवनात ऐनवेळी ताप नको म्हणून छोटे मोठे वाहन खरेदी करून स्वत:च्या प्रवासाची सोय करून घेतात. ही वाहने काही विशिष्ट ठिकाणीच निर्माण केली जाते.
वाहन निर्माण (उत्पादन) करणाऱ्या ऑटोमोबाईल कंपन्या (उदा. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती उद्योग) आपली वाहने विविध शहरात पोहचवण्यासाठी रेल्वेची मदत घेतात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी मुंबई विभागातील कळंबोली, भुसावळ विभागातील नाशिक रोड, सोलापूर विभागातील दौंड आणि विलाड तसेच पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी या ठिकाणाहून वाहतुकीसाठी मोटारींचे लोडिंग करण्यात येते. उपरोक्त रेल्वे यार्डातून १ एप्रिल ते १० सप्टेंबर २०२३ दरम्यान मध्य रेल्वेने विविध प्रकारच्या एकूण ४८, ५०० वाहनांची वाहतूक केली. त्यातून रेल्वेला ८२ कोटी, ७८ लाखांचा महसुल प्राप्त झाला.
वर्षभरात २१ कोटींची वाढ
१ एप्रिल २०२२ ते १० सप्टेंबर २०२२ या कालावधीतील रेल्वेने ऑटोमोबाईल्स कंपन्यांच्या वाहनांची वाहतूक करून ६१ लाख, ८१ कोटींचे उत्पन्न मिळवले होते. या वर्षी त्यात सुमारे २१ कोटींची अर्थात ३३ टक्के महसुलाची वाढ झाली आहे.