नागपूर/ अमरावती : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये विदर्भातील ४८ विद्यार्थी अडकले असून, त्यांच्या चिंतेत पडलेल्या पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क चालविला आहे. ‘लोकमत’च्या चमूने विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रतिक्रिया जाणून घेतली. हे विद्यार्थी सुखरूप असले तरी एकूणच परिस्थिती पाहता त्यांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली वाढविण्याची भावना त्यांनी बोलून दाखविली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील पीयूष गोमाशे, तनुजा खंडाळे, सेजल सोनटक्के, हिमांशू पवार व रविना थाकीत या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती सादर केली.
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक
यांच्या व्यतिरिक्त जे कोणी युक्रेनमध्ये अडकलेले असतील, त्यांच्या नातेवाइकांनी त्वरित जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील ०७१२-२५६२६६८ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे नागपूरच्या जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
अमरावती जिल्ह्यातील दहा विद्यार्थी बंकरमध्ये
अमरावती जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेपलीकडे पोलंड व रुमानिया या देशात जाण्याच्या सूचना दूतावासातर्फे देण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक बारब्दे, प्रणव फुसे, साहिर तेलंग, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ गजभिये, स्वराज पुंड, प्रणव भारसाकळे, कुणाल कावरे आणि नेहा लांडगे यांचा समावेश आहे. आमच्या हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये तात्पुरता बंकर करण्यात येऊन आम्हाला ठेवण्यात आलेले आहे. बाहेरचा संपर्क नाही. ‘रेडी टू इट’ जेवण मिळत आहे. किव्ह पासून २०० किमी अंतरावरील व्हिनितसिया शहरात आहोत. येथे सकाळी बॉम्ब टाकण्यात आले. आम्ही खूप घाबरलो असल्याचे स्वराज पुंड यांनी सांगितले.
दूतावासाच्या यादीची प्रतीक्षा
रशियाच्या बॉम्ब हल्ल्यांनी हादरलेल्या युक्रेनमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सहा विद्यार्थी अडकून पडले आहेत. यापैकी एक दूतावासाच्या मदतीने परतीच्या प्रवासाला लागला असून, अन्य पाचजण दूतावासाच्या यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
दारव्हा येथील संकेत राजेश चव्हाण हा चर्नी युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी पाच दिवसांपूर्वीच युक्रेनमध्ये पोहोचला होता. दुसऱ्याच दिवशी युद्धाला तोंड फुटले. मात्र, आपल्या हॉस्टेल पासून ५५० किलोमीटर अंतरावर बॉम्बहल्ला झाल्यामुळे सध्यातरी आपण सुरक्षित असल्याचे संकेतने सांगितले. सध्या युक्रेनमधील एटीएमवर मोठी गर्दी होत असल्याचे तो म्हणाला.
अभिनय राम काळे हा यवतमाळचा विद्यार्थीदेखील चर्नी विद्यापीठात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. बॉम्ब हल्ल्याच्या ठिकाणापासून वसतिगृह दूर आहे. आम्हाला बाहेर पडण्यास मनाई आहे, असे असे अभिनयने ‘लोकमत’ला सांगितले.
महागाव तालुक्यातील तुळशीनगर येथील गौरव नागोराव राठोड हा विद्यार्थीदेखील याच विद्यापीठात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. शुक्रवारी सायंकाळी आम्हाला बसद्वारे रोमानिया पर्यंत पोहोचविल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, याच विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या ऋषीकेश सुधाकर राठोड (पुसद), हिमांशू मोतीराम पवार (दिग्रस), मो. सोहेब मो. सलीम मिरवले (दिग्रस) हे आणखी तीन विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील चार विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील हर्षित अरुणकुमार चौधरी, तुमसर तालुक्यातील खापा येथील विनोद ठवकर, लाखनी येथील श्रेयश चंद्रशेखर निर्वाण आणि तुमसर येथील निकिता भोजवानी हे चार विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. गडचिरोलीतील तीन विद्यार्थिनी अडकल्या असून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे.
अकोला- बुलडाण्यातील दहा विद्यार्थी
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अकोला- बुलडाण्यातील दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पिरोग्रोव्ह येथील निष्कर्ष सानप हा देऊळगाव राजाचा विद्यार्थी सध्या रेल्वेद्वारे रोमानियात जात असून, तेथून तो विमानाद्वारे भारतात पोहोचणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. दुसरीकडे पिंपळगाव काळे आणि खामगाव मधील पारखेड येथील दोन विद्यार्थी हे रशियाची राजधानी मास्कोपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या मोरेन्स सिटीमध्ये सुरक्षित आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील आकांक्षा प्रकाश अवचार ही १९ फेब्रुवारीलाच त्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने रशियाला रवाना झाली होती. सध्या ती सोलेन्डस्की ओलेस्टा येथे मोरेन्स सिनियर सिटीमध्ये आहे. येथेच खामगाव तालुक्यातील पारखेड येथील सुशील विजय यादगिरे हाही आहे.
विदर्भातील विद्यार्थी
नागपूर ५
अमरावती १०
यवतमाळ ६
भंडारा ४
वर्धा १
गडचिरोली ३
बुलडाणा ६
अकोला ४
गोंदिया ३
चंद्रपूर ६
(कॅप्शन : विद्यार्थ्यांना चर्नी विद्यापीठातून रोमानियापर्यंत पोहोचविण्यासाठी बस येताच विद्यार्थ्यांनी अशी गर्दी केली). विद्यापीठात अडकलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील संकेत चव्हाण या विद्यार्थ्याने पाठविलेले हे छायाचित्र.