मेडिकल : ७ मेगावॅट वीज निर्मितीचा प्रस्ताव, दरमहा ५० लाखांवरील खर्चाची बचत होणारनागपूर : महागड्या दराने खरेदी कराव्या लागणाऱ्या विजेचा खर्च परवडणारा नसल्याने आणि २४ तास कमी खर्चात वीज उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ४९ कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. शासनाकडून याला मंजुरी मिळाल्यास ७ मेगावॅट वीज निर्मिती होऊन पुढील २० वर्षांचा विजेवरील कोट्यवधीचा खर्च वाचणार आहे. सध्या मेडिकलला विजेवर दरमहा ५० ते ९० लाख रुपये खर्च करावा लागत आहे.विदर्भासह आजूबाजूच्या पाच राज्यांचा भार मेडिकल रुग्णालय सांभाळत आहे. नुकतेच सुरू झालेले ट्रॉमा केअर सेंटर, पुढे होऊ घातलेले तीन विभागांचे अतिदक्षता विभाग, मेडिकलमधील विविध विभाग, त्यांच्या अंतर्गत येणारे वॉर्ड, बाह्यरुग्ण विभाग, तसेच कॉलेजचे विविध विभाग, वसतिगृह आणि सुमारे २०० एकर परिसराला प्रकाशमान करण्यासाठी प्रशासनाला महावितरणकडून वीज खरेदी करावी लागते. तसेच विजेच्या वाढत्या टंचाईमुळे अनेकवेळा वीज खंडित होण्याचा फटकाही सहन करावा लागतो. शासन दरवर्षी मेडिकलला विजेसाठी आठ कोटी रुपयांचे अनुदान देते. परंतु वाढते विभाग, वॉर्ड व यंत्रसामूग्रीमुळे खर्च आणि अनुदान यात मेळ बसणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. तो टाळण्यासाठी आणि खर्चातही बचत करणे, असा दुहेरी हेतू या सौर ऊर्जेतून साध्य करण्याचा मेडिकल प्रशासनाचा प्रयत्न आहे.रोज लागते ६ मेगावॅट वीजमेडिकलला रोज साधारण ६ मेगावॅट वीज लागते. महिन्याकाठी याचे बिल ५० ते ९० लाखांच्या घरात जाते. उन्हाळ्यात हेच बिल सव्वा कोटींवर पोहचते. एका वर्षाचा खर्च काढल्यास साधारण खर्च नऊ कोटींवर जातो. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पुढील २० वर्षे मेडिकलचा विजेवरील खर्च वाचण्याची शक्यता आहे.
४९ कोटींचा सौर प्रकल्प!
By admin | Published: September 23, 2016 3:00 AM