दररोज १४५ प्रकरणे दाखल
महिन्याला २५०० वर प्रकरणे
वर्षाला २० हजार प्रकरणे दाखल
तीन महिन्यांपेक्षा अधिकची केवळ १६४ प्रकरणे प्रलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सध्याच्या घडीला जानेवारी अखेरीस ४,९३२ प्रकरणे प्रलंबित आहेत. समितीकडे दररोज किमान १४५ अर्ज (प्रकरणे) दाखल होतात. महिन्याला जवळपास २५०० प्रकरणे दाखल होत असतात. ५ हजारांच्या जवळपास प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून येत असले तरी ती सर्व प्रकरणे सध्या प्रक्रियेत आहेत. तीन महिन्यांपेक्षा अधिकची केवळ १६४ प्रकरणे सध्या पेंडिंग आहेत.
नागपूर शहर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर आहे. त्यामुळे येथील समितीकडे प्रकरण दाखल होण्याची संख्याही मोठ्या प्रमाणावर असते. सध्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे काम सोपे झाले असले तरी अडचणी आहेत. परंतु इतर शहरांच्या तुलनेत नागपुरात प्रकरणे निकाली निघण्याचे प्रमाण चांगले आहे. गेल्या महिन्यात जवळपास दोन हजार प्रकरणे निकाली निघाली. शैक्षणिक प्रवेश आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकरणांची संख्या अधिक असते. एकाचवेळी गर्दी होत असल्याने कामावर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या जात वैधता पडताळणीसाठी आधीपासूनच अर्ज करणे आवश्यक आहे.
बॉक्स
प्रकरण निकाली निघायला ३ ते १५ दिवस
साधारणपणे अर्जात कुठलीही त्रुटी नसेल तर तीन दिवसांत अर्ज निकाली काढला जातो. अर्ज करणाऱ्याची गरज लक्षात घेऊनही अर्ज निकाली काढले जातात. नियमानुसार १५ दिवसांचा वेळ लागतोच. त्रुटी असतील तर वेळ अधिक होतो.
बॉक्स
अध्यक्षांकडे तीन जिल्ह्यांची जबाबदारी
नागपूरच्या समितीकडे अध्यक्षांसह तीन अधिकारी, दोन क्लार्क, दोन पोलीस व इतर कंत्राटी असा एकूण १६ जणांचा स्टाफ आहे. कंत्राटीमध्येही चार जागा रिक्त आहेत. प्रमाणपत्र तपासणीचे मुख्य काम अधिकाऱ्यांनाच करायचे आहे. नागपूर हे मोठे शहर आहे. यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्जही मोठ्या प्रमाणावर येतात. अशा परिस्थतीत गडचिरोलीसारख्या शहरातही तीन अधिकारी आणि नागपूरसारख्या शहरातही तीन अधिकारी कार्यरत आहेत. यातच नागपूरच्या अध्यक्षांकडे अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांचीही जबाबदारी आहे.
बॉक्स
२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३१ मार्चपूर्वीच अर्ज करावेत
जे विद्यार्थी आता १२वी विज्ञान शाखेत शिकत असतील, ज्यांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात आरक्षणांतर्गत प्रवेश घ्यायचा असेल किंवा ज्यांना बीएड, एमसीए, एलएलबी, एमबीए या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बसू इच्छिणाऱ्यांनी ३१ मार्च २०२१ पूर्वीच जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा. अर्ज करताना सर्व मूळ प्रमाणपत्रांची सर्व कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करावीत.
- सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य, नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती