लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना नवीन लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड कार्यक्रमांतर्गत हे लॅपटॉप देण्यात येणार असून, यासाठी निधी मंजूर झालेला आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यातील सर्व ४२६ तलाठी आणि ७० मंडल अधिकारी असे एकूण ४९६ लॅपटॉप खरेदी करण्यात आले असून, ते तालुकास्तरावर उपलब्ध करण्यात आले आहेत. तलाठ्यांपर्यंत हे नवीन लॅपटॉप पोहोचवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सध्या फेरफारची सर्व कामेही ऑनलाईनच होतात. राज्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी त्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी केली होती. यातच कोरोना वाढल्याने वर्क फ्राॅम होमचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नवीन लॅपटॉपची गरज आणखीनच वाढली. त्यामुळे राज्य सरकारनेही याची दखल घेत निधी मंजूर केला. नागपूर जिल्ह्यासाठी मागणीनुसार २ कोटी २३ लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यातून सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना नवीन लॅपटॉप उपलब्ध करण्यात आले.
चौकट
सन २०१४ मध्ये मिळालेले लॅपटॉप बहुतांश बिघडले
नागपूर जिल्ह्यात यापूर्वी ई - महाभूमीअंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना यापूर्वी २०१४ मध्येसुद्धा लॅपटॉप देण्यात आले होते. ते लॅपटॉप जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आले. या लॅपटॉपची तशी कालमर्यादा संपलेली आहे. बहुतेक लॅपटॉप खराब झालेले आहेत. त्यामुळे नवीन लॅपटॉप मिळावेत, यासाठी तलाठी व मंडल अधिकारी वारंवार मागणी करीत होते. राज्य शासनाने त्यांची मागणी मान्य केली.
चौकट
तालुकानिहाय उपलब्ध करण्यात आलेले लॅपटॉप
तालुका मंडल अधिकारी तलाठी एकूण संख्या
------------------------------------------------
नागपूर शहर ३ १९ २२
नागपूर ग्रामीण ६ ३३ ३९
हिंगणा ६ ३३ ३९
कामठी ४ २४ २८
मौदा ६ ३३ ३९
काटोल ६ ३७ ४३
नरखेड ६ ३८ ४४
सावनेर ५ ३२ ३७
कळमेश्वर ४ २६ ३०
रामटेक ४ २६ ३०
पारशिवनी ४ २६ ३०
उमरेड ६ ३६ ४२
भिवापूर ४ २६ ३०
कुही ६ ३७ ४३
-----------------------------------------------
एकूण ७० ४२६ ४९६
नवीन लॅपटॉप मिळाले
जुने लॅपटॉप खराब झाले होते. त्यामुळे शासनाने आता नवीन लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहेत. नवीन लॅपटॉप आम्हाला मिळाले आहेत.
रोशन बारमासे
तलाठी