मध्य भारतातील पहिले उपकरण : हृदयरोग रुग्णांना मिळणार अद्ययावत उपचार नागपूर : हृदयातील व्हॉल्व्हशी संबंधित रोग, हृदयातील स्नायूंच्या कार्यामधील अडथळे, शिवाय हृदयात रक्तसंचारण योग्यपद्धतीने सुरू आहे किंवा नाही यासारख्या अनेक गोष्टींच्या निदानासाठी ‘इको कार्डीओग्राफी’ महत्त्वाचे ठरते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यासाठी ‘२डी ईको’ उपकरण आहे. परंतु हे उपकरण वारंवार बंद पडत असल्याने अद्यावत ‘४ डी ईको’ उपकरण खरेदी करण्याचा निर्णय मेडिकल प्रशासनाने घेतला. दोन कोटी रुपयांच्या या उपकरणाची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मे महिन्यात रुग्णसेवेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून रुग्ण येतात. विशेष म्हणजे, यात हृदयरोग रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. रुग्णालयाच्या हृदय चिकित्साशास्त्र विभागात सुमारे सहा वर्षांपूर्वी ‘२ डी इको’ उपकरण खरेदी करण्यात आले. रोज यावर ४० ते ५० रुग्णांचे ‘इको’ काढले जातात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे उपकरण वारंवार बंद पडत होते. परिणामी, रुग्णांचा याचा फटका बसत होता. याची दखल घेत नवे तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या ‘४डी इको’ उपकरण खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या हे उपकरण भारतात काही तुरळक रुग्णालयामध्येच आहेत. महाराष्ट्रात चार-पाच रुग्णालयात हे उपकरण असल्याचे बोलले जाते. या उपकरणामुळे हृदय रोगाच्या रुग्णांची व्यवस्थित तपासणी करता येणे शक्य होणार आहे. त्यात हृदयाचा आकार व कार्यक्षमता, स्नायूमधील दोष, झडपेचा आकार आणि त्यांचे कार्य, तसेच हृदयाच्या पडद्याचे आजार यांची माहिती मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे, आजाराची योग्य माहिती मिळाल्यास प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे. मध्यभारतातील हे पहिले उपकरण ठरणार आहे. (प्रतिनिधी) खरेदी अंतिम टप्प्यात रुग्णांना अद्ययावत सोयी मिळाव्या यासाठी मेडिकलचा नेहमीच प्रयत्न असतो. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले ‘२डी इको’ उपकरण आहे. परंतु आता हे तंत्रज्ञान जुनाट झाले आहे, त्या जागी नवे तंत्रज्ञान ‘४डी इको’ खरेदी करण्याचा निर्णय मागेच घेण्यात आला होता. दोन कोटी रुपयांचे या उपकरणाची खरेदी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. -डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल
‘सुपर स्पेशालिटी’मध्ये आता ४ डी इको
By admin | Published: May 01, 2017 1:05 AM