नागपूर : ‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामात जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असून २०१५-१६ पासून ५८ महिन्यांत २५ कोटींहून अधिक किमतीचे गहू-तांदूळ खराब झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘एफसीआय’कडे विचारणा केली. ‘एफसीआय’कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २०१५-१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत ०.२१६ एलएमटी (लाख मेट्रिक टन) गहू-तांदूळ खराब झाले. यात ०.०९८ एलएमटी गहू व ०.११८ एलएमटी तांदळाचा समावेश होता. खराब झालेल्या गहू-तांदळाची किंमत ही २५ कोटी १२ लाख इतकी होती. यात ९ कोटी २४ लाख रुपयांचे गहू व १५ कोटी ८८ लाखांच्या तांदळाचा समावेश होता. २०१६-१७ मध्ये सर्वाधिक ०.०९ एलएमटी गहू तांदूळ खराब झाले. त्याची किंमत ९ कोटी १२ लाख इतकी होती. २०१८-१९ मध्ये ६ कोटी ७३ लाख तर २०१९-२० मधील पहिल्या १० महिन्यातच २ कोटी ६१ लाखांचे गहू-तांदूळ खराब झाले.
‘उंदरांमुळे काहीच नुकसान नाही’‘एफसीआय’मध्ये उंदरांमुळे काहीच नुकसान झाले नसल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. ‘एफसीआय’कडून वैज्ञानिकरीत्याधान्य साठविण्यात येते. नियमितपणे ‘पेस्ट कंट्रोल’देखील होते, असे सांगण्यात आले.