सभागृहात प्रस्ताव मंजुरीसाठी : मिशन ३३२ कोटी यशस्वी करण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या मालमत्ता विभागातर्फे १५ ते ३० जून दरम्यान कर भरणाऱ्यांना १० टक्के सूट देण्याची योजना राबविण्यात आली. याचा लाभ ४५,७९८ करदात्यांनी लाभ घेतला. या योजनेत मनपा तिजोरीत २७.१० कोटी जमा झाले. करदात्यांना २.५० कोटींहून अधिक सूट देण्यात आली. आता १ जुलै ते ३१ डिसेंबर दरम्यान पूर्ण कर भरणाऱ्यांना ५ टक्के सूट दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव २२ जुलैच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
१७ फेब्रुवारी २०२१ च्या सर्वसाधारण सभेत ३० जूनपर्यंत संपूर्ण टॅक्स भरणाऱ्यांना १० टक्के सूट तर ३१ डिसेंबरपर्यंत टॅक्स भरणाऱ्यांना ५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र इतिवृत्त लिहिताना टंकलेखनात चूक झाल्याने ५ टक्के सूट देण्याचा निर्णय सुटला होता. या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी २२ जुलैच्या सभागृहात हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
...
९०० कोटींची थकबाकी
नागपूर शहरात सात लाख मालमत्ताधारक आहेत. २०२०-२१ या वर्षासाठी वसुलीचे उद्दिष्ट ३३२ कोटींचे असले तरी मालमत्ता कराची जुनी थकबाकी तब्बल ९०० कोटी आहे. यात काही शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. काही मोठ्या थकबाकीदारांचा समावेश आहे. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने करवसुली करता येत नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
....
१० टक्के सवलतीचे ४५,७९८ लाभार्थी
३० जूनपर्यंत टॅक्स भरणाऱ्यांना १० टक्के सूट देण्यात आली. परंतु ४५,७९८ करदात्यांनीच याचा लाभ घेतला. ५ टक्के सवलतीचा जास्तीतजास्त मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा, यातून मनपा तिजोरीत महसूल जमा व्हावा, यासाठी मालमत्ता विभागाने नियोजन केले आहे. झोननिहाय बैठका सुरू आहेत.
...
शास्ती माफीचा निर्णय प्रलंबित
कोविड संक्रमणामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी मनपा सभागृहात २२ जूनला ३ वर्षांच्या थकीत मालमत्ता करावरील दंडाची रक्कम माफ करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र दंड माफ करण्याचा अधिकार मनपा आयुक्तांना आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
...