जगदीश जोशी
नागपूर : गेल्या ८ महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शहर आणि ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांसह पाच कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक केली. यात सर्वाधिक एक अधिकारी तसेच तीन कर्मचारी ग्रामीण पोलीस आहेत. एसीबीच्या नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर ग्रामीण पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
‘एसीबी’ने २४ ऑगस्टला ग्रामीण एलसीबीचे सहाय्यक उपनिरीक्षक जयप्रकाश शर्मा यांना बारच्या संचालकाकडून १० हजाराची लाच घेताना अटक केली. या कारवाईमुळे एलसीबीसोबत ग्रामीण पोलिसात खळबळ उडाली आहे. शर्मा बारच्या संचालकाकडून मागील आणि चालू महिन्यात सहा-सहा हजार रुपयांच्या हिशेबाने १२ हजार रुपये मागत होता. त्यानंतर एसीबीने शर्माला १० हजाराची लाच घेताना पकडले. एसीबीच्या नागपूर रेंजने जानेवारी ते ऑगस्टदरम्यान लाच घेण्याच्या ४७ कारवाई केल्या. यात तीन कारवाया ग्रामीण आणि शहर पोलिसात करण्यात आल्या. १९ जानेवारीला कुहीमध्ये नायक शिपाई सारंग आष्टणकरला लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर कुहीच्याच पाचगाव चौकीत उपनिरीक्षक भारत चिटे आणि कर्मचारी अमित पवारला पकडण्यात आले. दोघेही अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांकडून वसुली करीत होते. वाळू तस्करी आणि अवैध वाहतुकीला संरक्षण देण्यात पाचगाव चौकीची महत्त्वाची भूमिका होती. या कारवाईचा ग्रामीण पोलिसांवर मोठा परिणाम झाला होता. एसीबीने तिसरी कारवाई आठ जूनला शहरात केली होती. वाहतूक शाखेच्या सोनेगाव चेंबरमधील शिपाई बिपीन महाजनला लाच घेताना अटक केली होती. सुत्रांनुसार गेल्या पावणे दोन महिन्यात एसीबीला ग्रामीण पोलिसांशी निगडीत तक्रारी मिळत होत्या. परंतु पीडित समोर येत नसल्यामुळे त्यावर कारवाई झाली नाही. नुकत्याच झालेल्या कारवाईबाबत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. पोलिसांशी निगडीत लोक याला नियोजित असल्याचे सांगत आहेत, तर जाणकारांच्या मते हे होणारच होते, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांना अतिरिक्त महासंचालक म्हणून पदोन्नती देऊन मुंबईला पाठविण्यात आले. त्यांच्या जागेवर स्वच्छ प्रतिमेच्या छेरींग दोरजे यांना नेमणूक देण्यात आली आहे. त्यांची पत्नी अश्वती दोरजे यांना शहर पोलिसात खूप दिवसांपासून रिक्त असलेल्या सह पोलीस आयुक्त पदावर नेमण्यात आले आहे.
..........
छेरींग दोरजे यांच्या नेमणुकीमुळे बिघडला खेळ
नागपूर रेंजमध्ये छेरींग दोरजे यांच्या नेमणुकीमुळे खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षकाची खुर्ची मिळविण्यासााठी जिल्ह्यात तैनात अनेक आयपीएस प्रयत्न करीत आहेत. काही जण तर जागोजागी चकरा मारत आहेत. छेरींग दोरजे यांची प्रतिमा पाहून ग्रामीणमध्ये जाण्यास इच्छुक अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असून, चांगल्या अधिकाऱ्यांना यश मिळण्याचा भरवसा व्यक्त करण्यात येत आहे.
..........