नागपूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मध्यवर्ती कारागृहातील १०० वर कैदी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. आता काही दिवसांपूर्वी चार तर आता पुन्हा कारागृहात पाच कैदी पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. या रुग्णांसह नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी ६५ रुग्णांची नोंद झाली.
नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहे. गुरुवारी ९५ वर गेलेल्या रुग्णसंख्येत शुक्रवारी घट झाली. मात्र, पॉझिटिव्हिटी दरात वाढ झाली. मागील चोवीस तासांत १ हजार ८९९ चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर ३.४ टक्क्यांवर पोहोचला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ४ जुलैपर्यंत कारागृहात ९४ रुग्णांची नोंद झाली होती. यावरील उपाययोजनांसाठी कारागृह प्रशासनाने आपल्या स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. आता पुन्हा रुग्ण दिसून येत आहेत. प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कारागृहातील १२ संशयित रुग्णांची तपासणी केली असता चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यांच्या संपर्कातील ५० जणांची तपासणी केली असता पुन्हा पाच रुग्णांची नोंद झाली आहे.
- शहरात ४६, ग्रामीणमध्ये २६ रुग्ण
शहरात आज ४६ तर ग्रामीणमधील १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असले तरी शहरातील ३४ तर ग्रामीणमधील २६ असे एकूण ६० रुग्ण बरे झाले. सध्या चार रुग्ण विविध रुग्णालयात भरती असून ३५१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.