लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मोठमोठ्या थापा मारत सिनेसृष्टीत गुंतवणुकीची ऑफर देऊन मुंबईच्या एका आरोपीने नागपुरातील तरुणाला पाच लाखांचा गंडा घातला. धर्मेंद्र चुन्नीलाल बिणकर (रा. सॅलेटाइन क्लासिक, जोगेश्वरी, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.
दीपा प्रदीप गोळे (वय ५४, रा. गोळे भवन, महाल) यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बिनकरसोबत त्यांची ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीला सोन्याचे दिवस असून, मराठी चित्रपट निर्मितीत गुंतवणूक केल्यास प्रचंड लाभ मिळेल. सोबतच प्रतिष्ठाही प्राप्त होईल, अशी थाप मारून बिनकरने दीपा यांच्या मुलावर जाळे फेकले. चित्रपट निर्मितीत रक्कम गुंतविण्यापूर्वी ५ लाखांची स्टॅम्प ड्यूटी भरावी लागेल, असेही सांगितले. त्यानुसार, २९ मार्च २०१७ ला दीपा गोळे यांच्या मुलाने आरोपीच्या खात्यात पाच लाख रुपये आरटीजीएस केले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आरोपीने करारनामा केला नाही. तो टाळाटाळ करीत असल्याने गोळे यांनी त्याला आपली रक्कम परत मागितली. मात्र, चार वर्षे होऊन त्याने ती रक्कमही परत केली नाही. त्यामुळे गोळे यांनी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सोमवारी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी केली जात आहे.
---