लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत मनपातील सुमारे ३५ टक्के पदे रिक्त आहेत. नवीन पदांची भरती बंद असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच परत कामावर घेण्यात येत आहे. अशा स्थितीत नवीन लोकांना संधी मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. मनपामध्ये किती मंजूर पदे आहेत व त्यातील किती पदे रिक्त आहेत, किती निवृत्त कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यात आले, नवीन पदभरतीसंदर्भात मनपाची काय भूमिका आहे, इत्यादी प्रश्न विचारण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार मनपामध्ये वर्ग १ ते वर्ग ४ मिळून ११ हजार ९६१ मंजूर पदे आहेत. यापैकी ७ हजार ९५० पदे भरली असून तब्बल ४ हजार ११८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ३४.४३ इतकी आहे. वर्ग १ मधील २१४ पैकी १०३ पदे रिक्त आहेत. तर वर्ग २ ची ६१ पैकी ५० पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मधील ३ हजार ८१२ पैकी २ हजार १६ पदे रिक्त आहेत.साडेपाच वर्षांत पंधराशे सेवानिवृत्त१ जानेवारी २०१४ ते ३० जून २०१९ या कालावधीत मनपातून १ हजार ५१९ कर्मचारी-अधिकारी सेवानिवृत्त झाले. तर १७८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर त्यांच्या वारसदारांना अटी व शर्तींच्या अधिन राहून संधी देण्यात आली. परंतु सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांवर नवीन भरती झाली नाही. अनेक जागांवर तर परत सेवानिवृत्तांनाच कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्यात आले. यातील एकालाही ५० हजारांहून जास्त वेतन नाही. मनपाचा खर्च जास्त असल्याने तो ३५ टक्क्यांच्या मर्यादेत येत नाही, तोपर्यंत पुढील पदभरती करता येणार नाही, असे राज्य शासनाच्या निर्णयात नमूद होते. त्यानुसार नवीन भरती झालेली नाही.रिक्त पदांची आकडेवारीसंवर्ग मंजूर पदे रिक्त पदेवर्ग-१ २१४ १०३मानसेवी डॉक्टर ८५ ३७वर्ग-२ ५० ६१वर्ग-३ ३,८१२ २,०१६शिक्षक १,०६५ ०वर्ग-४ २,७८५ १,७११सफाई कामगार ३,९३९ २०१
मनपातील ३५ टक्के पदे रिक्त : कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कामाचा ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 7:35 PM
सद्यस्थितीत मनपातील सुमारे ३५ टक्के पदे रिक्त आहेत. नवीन पदांची भरती बंद असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच परत कामावर घेण्यात येत आहे.माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
ठळक मुद्देनव्यांच्या ऐवजी सेवानिवृत्तांनाच परत संधी