नागपूर विद्यापीठ ‘बॅकफूट’वर : प्राचार्यांनी केला विरोध लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम’ असलेल्या ‘५०-५०’ परीक्षा प्रणालीला परत एकदा हादरा बसला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रणालीच्या अंमलबजावणीला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तूर्तास ही प्रणाली लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी विद्वत् परिषदेने मान्यता दिल्यानंतर ६० : ४० परीक्षा प्रणालीचा प्रस्तावदेखील महाविद्यालयांच्याच विरोधामुळे मावळला होता. नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली प्रशासनासाठी सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्यातच पदवी अभ्यासक्रमांनादेखील सत्र प्रणाली लागू झाल्यामुळे परीक्षा विभागावरील ताण प्रचंड वाढला आहे. हा ताण कमी व्हावा यासाठी महाविद्यालयांतदेखील परीक्षा सुरू करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. यासंदर्भातील प्रस्ताव विद्वत् परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला. याला मंजुरी देण्यात आली होती. नवीन शैक्षणिक सत्रापासून या प्रणालीची अंमलबजावणी करायची की नाही, यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गैरव्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांची मंगळवारी दीक्षांत सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी महाविद्यालयांसमोर या प्रणालीबाबत सादरीकरण केले. मात्र अनेक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या प्रणालीबाबत नाराजीचा सूर लावला. या प्रणालीत एका सत्राची परीक्षा विद्यापीठ तर एका सत्राची परीक्षा महाविद्यालय घेईल, असे प्रस्तावित होते. अनेक महाविद्यालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही. अशा स्थितीत महाविद्यालयांचे काम प्रभावित होईल व प्राध्यापकांना दुप्पट काम करावे लागेल. शिवाय ग्रामीण भागांमध्ये महाविद्यालयांवर पेपर ‘मॅनेज’ करण्याबाबत दबाव येईल, अशा आशयाची कारणे यावेळी प्राचार्यांकडून मांडण्यात आली. महाविद्यालयांकडून येणारा एकूण नकारार्थी सूर लक्षात घेता, संबंधित प्रणाली तूर्तास लागू न करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला. सत्र प्रणाली मागे घेण्याची मागणी दरम्यान, गैरव्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सत्र प्रणालीदेखील मागे घेण्याची मागणी केली. या प्रणालीमुळे महाविद्यालयांवर ताण येत असल्याचे त्यांनी कारण दिले. विद्यापीठाने सकारात्मक दिशेने वाटचाल केली पाहिजे. सत्र प्रणाली रद्द करणे म्हणजे दोन पावले मागे जाणे होईल. ते संयुक्तिक ठरणार नाही. त्यामुळे ही प्रणाली रद्द करण्यात येणार नाही, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले. ऐनवेळी पलटले प्राचार्य या बैठकीला साधारणत: १५० महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. बैठकीच्या एक दिवसअगोदरपर्यंत ६० ते ७० महाविद्यालयांचे प्राचार्य ५० : ५० प्रणालीबाबत सकारात्मक होते व तसे आश्वासनदेखील त्यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र बैठकीच्या वेळी कुणीही तोंडातून शब्ददेखील काढला नाही, अशी माहिती एका प्राचार्यांनीच गोपनीयतेच्या अटीवर दिली. ऐनवेळी हे सर्व प्राचार्य का गप्प बसले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ...तर कुलगुरूंनी राजीनामा द्यावा ! बैठकीदरम्यान बहुतांश प्राचार्यांनी मौनच राखले. मात्र एका प्राचार्यांनी या प्रस्तावाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. गेल्या ३० वर्षांपासून मी विद्यापीठाचे राजकारण पाहतो आहे. कुठलाही सकारात्मक बदल करायचा असेल तर विशिष्ट लोक विरोधच करतात. ५० : ५० प्रणाली महाविद्यालयांसाठीदेखील चांगली असून याची अंमलबजावणी व्हायलाच हवी. जर असे करता येत नसेल तर कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. मागील वर्षीदेखील बारगळला होता प्रस्ताव मागील वर्षीदेखील नागपूर विद्यापीठात ६० :४० परीक्षा प्रणाली लागू करण्याचे प्रयत्न झाले होते. यानुसार ६० टक्के गुणांची परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येणार होती. ही परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार होते तर ४० टक्के गुणांची परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांकडे देण्यात येणार होती. यामुळे विद्यापीठावरील ताण कमी होऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठीदेखील तयार होतील, अशी विद्यापीठाची भूमिका होती. मात्र महाविद्यालयांचा विरोध व ‘मास कॉपी’ची भीती यामुळे हा प्रस्तावदेखील बारगळला होता.
‘५०-५०’ परीक्षा प्रणालीला ‘ब्रेक’
By admin | Published: June 07, 2017 1:46 AM