लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. डिझेल बसमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याचे प्रयत्न अनेक शहरात सुरू आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील बसेस सीएनजीवर धावतात. लवकरच नागपूर शहरातील सार्वजनिक परिवहन सेवेतील ५० बसेस सीएनजीवर धावणार आहेत.रॉमेंट कंपनीने महापालिकेच्या परिवहन विभागाला ५० स्टँडर्ड बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याचा महापालिकेवर कोणत्याही स्वरुपाचा आर्थिक बोजा पडणार नाही. सोबतच इंधनावरील खर्च कमी होणार आहे. कंपनी आधी डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत करणार आहे. सोबतच सीएनजी उपलब्ध करणार आहे. मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.तूर्त हा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर असला तरी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन विभागाला डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र परिवहन विभागापुढे सीएनजी पुरवठ्याचा प्रश्न आहे.सोमवारी रॉमेंट कंपनीतर्फे कौस्तुभ गुप्ता यांनी डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाला सादर केला. परिवहन विभागाने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र आजवरचा अनुभव विचारात घेता या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार की अन्य प्रस्ताव प्रमाणे हा प्रस्ताव धूळखात राहणार हे भविष्यात स्पष्ट होईल.आर्थिकदृष्ट्या फायदेशीरडिझेल बसच्या तुलनेत सीएनजी बसेस पर्यावरणपूरक असण्यासोबतच महापालिकेसाठी फायदेशीर ठरणार आहे. यातून परिवहन विभागाचा तोटा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्याने इंधनावरील खर्च कमी होईल.ग्रीनबस बंद पडण्याला विभागच जबाबदारकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम पर्यावरणपूरक ग्रीन बस प्रायोगित तत्त्वावर नागपुरात सुरू केली. परंतु महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे गेल्या दोन महिन्यापासून या बसेस एमआयडीसी डेपोत धूळखात आहेत. गडकरी यांनी यावर वेळोवेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. भांडेवाडी येथे बायो सीएनजी तयार करण्याचे गडकरी यांचे स्वप्न आहे. परंतु याबाबतही महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाही.
नागपुरात डिझेलच्या ५० बसेस धावणार सीएनजीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:51 AM
परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. डिझेल बसमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याचे प्रयत्न अनेक शहरात सुरू आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील बसेस सीएनजीवर धावतात. लवकरच नागपूर शहरातील सार्वजनिक परिवहन सेवेतील ५० बसेस सीएनजीवर धावणार आहेत.
ठळक मुद्देमनपाच्या परिवहन समितीकडे प्रस्ताव