नागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर जवळपास ५० कोटी रुपये खर्च होतील. सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)ने यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नागपुरातच हे अधिवेशन होईल, यावर निर्णय झाल्यावरच पीडब्ल्यूडी प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे. (50 crore to be spent on preparation for winter session)
सोमवारी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी उच्चस्तरीय समीक्षा बैठकीनंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल, असे स्पष्ट संकेत दिले आहे. तेव्हापासून अधिवेशनाच्या तयारीने गती पकडली आहे. साधारणत: ३० कोटी रुपयाच्या कार्याची निविदा जारी करण्यात आली आहे, तर २० कोटी रुपयाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या सगळ्या निविदा लवकरच वितरित केल्या जातील, असे पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी सांगितले. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत बहुतांश कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. कोरोना संक्रमण बघता २०१९ च्या तुलनेत आणखी काही निविदा जारी करण्यात आल्या आहेत. यात लिक्विड सॅनिटायझेशनचा पुरवठा व कीटकनाशकांची फवारणी आदी कार्यांचा समावेश आहे.
कंत्राटदार काम करण्यास सज्ज
२०१९ च्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या जवळपास ५० कोटी रुपयाच्या कामाचे बिल अद्याप पेंडिंग असल्याने कंत्राटदार नाराज आहेत. कंत्राटदारांच्या मतानुसार नागपूर प्रदेशात जवळपास ५०० कोटी रुपयांचे बिल पेंडिंग आहेत. हा पैसा मिळण्यासाठी त्यांनी आंदोलनही पुकारले होते. अशा स्थितीतही ते हिवाळी अधिवेशनाची कामे करण्यास तयार आहेत. दिवाळीपूर्वी पैसा मिळेल अशी आशा कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन साळवे यांनी व्यक्त केली आहे. याच अपेक्षेवर त्यांनी कामे सुरू केली आहेत.
रिकामे व्हायला लागले १६० खोली परिसर
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने १६० खोली परिसर रिकामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे शासकीय कर्मचाऱ्यांचे निवास आहे. प्रत्येक सत्रात हा परिसर रिकामा करावा लागतो. पीडब्ल्यूडीनुसार काही लोकांनी येथील आपले निवास सोडले आहे.
...............