आॅनलाईन लोकमतनागपूर : मेयो रुग्णालय हे विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या राज्यांच्या रुग्णांसाठी आधार आहे. या रुग्णालयाच्या कॅज्युल्टीपासून ते शवविच्छेदनगृहाच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्र्याची जबाबदारी सांभाळताच या रुग्णालयासाठी वेळोवेळी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच मेयो रुग्णालयाला पुढील आर्थिक वर्षात आवश्यक अद्यावत यंत्रसामुग्री व बांधकामासाठी ५० कोटी उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सुवर्ण जयंती महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री गौतमी तडीमल्ला, खा. डॉ. विकास महात्मे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेयोमधून बाहेर पडलेल्या अनेक डॉक्टरांनी केवळ देशातच नाही तर विदेशातही नाव कमावले आहे. हे कॉलेज शासनाने चालवावे यासाठी माझ्या वडिलांचे मोठे योगदान लाभले आहे. या रुग्णालयाच्या कॅज्युल्टीपासून ते शवविच्छेदनगृहाला जवळून पाहिले आहे. यामुळे या रुग्णालयाशी एक ऋणानुबंध आहे. या रुग्णालयाच्या विकासासाठी वेळोवेळी मदत दिली आहे. मुख्यमंत्री नागपूरचा आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिवही नागपूरचे असल्याने निधीची कमतरता पडणार नाही. आवश्यक बांधकाम व यंत्रसामुग्रीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास देतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी आ. कुंभारे यांनीही विचार मांडले.स्वागतपर भाषण अॅल्युमनाय असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आनंद पांगारकर यांनी केले. संचालन डॉ. सुषमा ठाकरे यांनी तर आभार सुवर्ण जयंती महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ. रवी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. के.आर. सोनपुरे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. विरल कामदार, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी, मधुमेह विशेषज्ञ डॉ. सुनील गुप्ता, डॉ. उमेश शिंगणे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी केले. त्या म्हणाल्या, मेयोमध्ये अनेक विकासात्मक कामे होत आहेत. पायाभूत सोई उपलब्ध होत आहेत. काही प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’मुळे मेयोचे चित्र बदलले आहे. यामुळे एमबीबीएसच्या १५०वरून २०० जागा करण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील आहोत, असेही त्या म्हणाल्या.ग्रामीण भागात सेवा द्यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात डॉक्टरांनी ग्रामीण भागात सेवा द्या, असे आवाहन केले. ते म्हणाले, ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर जायला तयार नाहीत. यामुळे शहर आणि ग्रामीण भागात वैद्यकीय दरी वाढत आहे. ती कमी करण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांनी दोन ते पाच वर्षांपर्यंत तरी ग्रामीण भागात रुग्णसेवा द्यायला हवी. आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण आपल्या कामाचे मूल्यमापन करू, तेव्हा पैसा, प्रतिष्ठा गौण होईल. आपण किती रुग्णांना मदत केली, किती रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले हेच महत्त्वाचे राहील.डॉ. संजना, डॉ. धर्मेंद्र व डॉ. कुणाल यांचा सत्कारया कार्यक्रमात डॉ. संजना संजीव जयस्वाल हिचा सिकलसेलवर आधारित शोधनिबंध गेल्या वर्षी लंडन येथे तर यावर्षी अटलांटा येथे प्रसिद्ध झाल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. धर्मंेद्र मिश्रा व डॉ. कुणाल खोब्रागडे यांचाही सत्कार करण्यात आला.