लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील संत्रा तसेच अन्य फलोत्पादक व भाजी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक कमी वेळेत व्हावी यासाठी किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. यातून माल पाठविल्यास शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात ५० टक्के सवलत मिळणार आहे. यासंदर्भात अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने परिपत्रकदेखील जारी केले आहे.
नागपूर, अमरावती, वर्धा या तीन जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावर संत्र्याचे पीक घेतले जाते. याशिवाय, विदर्भात फळे व भाज्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. हा माल एरवी प्रामुख्याने ट्रकद्वारे राज्यात व देशात विविध ठिकाणी पाठवला जातो. किसान रेल्वेमुळे वाहतुकीचा वेळ तर वाचणार आहेच, शिवाय आता वाहतूक खर्चातदेखील ५० टक्के सवलत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाद्वारे रेल्वेला या अनुदानाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधी पूर्ण खर्च स्वत: करून नंतर त्याचा परतावा मागण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार नाही. अन्न प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांचे गट-संघटना, सहकारी संस्था, शेतकरी किंवा त्यांचे समूह, परवानाधारक कमिशन एजंट, निर्यातक, पणन महासंघ, किरकोळ विक्रेते आदींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. वाहतूक खर्चासोबत साठवणुकीच्या खर्चातही ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
किसान रेल्वे केव्हा आणि कुठून सुटणार यासंबंधीचे वेळापत्रक रेल्वेच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.