नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील पालकांनी स्कूल फीमध्ये ५० टक्के सूट द्यावी, यासाठी मशाल रॅली काढली. लोकमत चौकातून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप व्हेरायटी चौकात झाला. शहरातील नामांकित शाळेतील पालक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
शाळा ऑनलाईन असतानाही शासनाने केवळ १५ टक्के फी माफ करण्याचे आदेश दिले. शासनाच्या या निर्णयाचा पालकांनी विरोध करीत ५० टक्के सूट देण्याची मागणी केली. नागपूर जागरूक पालक या बॅनरखाली ही रॅली काढण्यात आली. डीएफआरसीद्वारे शाळांचे ऑडिट करण्यात यावे, कोरोना काळातील ऑनलाईन स्कूल फीमध्ये ५० टक्के सूट द्यावी, फी नाही भरली म्हणून विद्यार्थ्यांना टीसी देऊ नये. प्रत्येक शाळेत ‘पीटीए’ची बैठक शासकीय प्रतिनिधींच्या समक्ष व्हावी. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्याचे संवर्धन करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी पालकांनी रेटून धरल्या. या मशाल रॅलीत गिरीश पांडे, नितीन नायडू , संदीप अग्रवाल, अभिषेक जैन, भवानी प्रसाद चौबे, अमोल हाडके, अमित होशिंग आदी सहभागी झाले होते.