नागपूर : देशात २२ लाख चालकांची गरज आहे. उत्तम चालक मिळण्यासाठी राज्यात विविध ५० ठिकाणी चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. या केंद्रासाठी व नागपूर जिल्ह्यातील गोधनी येथे मंजूर झालेले ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग ॲन्ड रिसर्च’ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीण इमारतीचा व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचा इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परिवहन व संसदीय कार्य मंत्री अॅड. अनिल परब होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, खा. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. परिणय फुके, आ. आशिष जयस्वाल यांच्यासह परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते.
चालक प्रशिक्षण केंद्रासाठी ६ एकर जागा
पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, शहरामध्ये मानेवाडा येथे परिवहन खात्यातील क्षेत्रीय परिवहन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी ६ एकर जागेची पाहणी केली आहे.
प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर ग्रामीणचे परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार पूर्व आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला माजी आमदार प्रकाश गजभिये, मिलिंद माने, नागपूर शहरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर आदी उपस्थित होते.