नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखविण्याचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचा मानस कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आधिच हाणून पाडला. अजनी चौक मेट्रो स्टेशन येथे कॅनवा मार्गापासून केवळ ११ आंदोलकांचे ५० फूट अंतर, हा यावेळी चर्चेचा आणि तेवढाच उपहासाचा विषय ठरला.
रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात वंदे भारत ट्रेन, फ्रीडम पार्क, माझी मेट्रोच्या फेज टू, एम्स आणि नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्यासाठी पंतप्रधान ज्या रस्ता मार्गाने संबंधित स्थळांवर पोहोचणार होते, त्या मार्गावर चाकचौबंद पोलीस बंदोबस्त होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची तसदी घेतली जात होती. वर्धा महामार्गावरील डॉ. हेडगेवार चौक ते अजनी चौक आणि रहाटे कॉलनी चौक ते फ्रीडम पार्क हा प्रवास उड्डाण पुलावरुन होणार होता. या मार्गादरम्यान अजनी चौक ते रहाटे चौक हा प्रवास जमिनीवरून होणार होता. अश्यात
अजनी चौक मेट्रो स्टेशन येथे पंतप्रधानांच्या कॅनवा मार्गापासून आंदोलकांना ५० फूट लांब ठेऊन पोलिसांनी कुठलीही घोषणा न करण्याची तंबी दिली होती. शिवाय कुठलेही पोस्टर आणि झेंडे फडकवण्यास मनाई केली होती. पंतप्रधानांचा कॅनवा येथून सकाळी ९.३५ वाजता निघाला आणि पोलिसांनी उसंत घेतली. त्यानंतर आंदोलकांना मोकळीक देण्यात आली. मात्र, केवळ ११च्या संख्येत असणाऱ्या आंदोलकांचा जोर कमी झाला होता. जणू हे ११ जण विदर्भातील ११ जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व एकटेच करत होते. फोटोसेशन आणि एखाद दोन बाईट देऊन आंदोलक पसार झाले. आंदोलनात अरुण केदार, तात्यासाहेब मते, नरेश निमजे, रेखा निमजे, ज्योती खांडेकर, नौशाद प्यारू, जया चातुरकर, मनीषा पुंडे, वीणा भोयर, पराग वैरागडे, मुकेश मासुरकर उपस्थित होते.