नागपूर : नवी मुंबईतील ७३ व ६२ वर्षीय ठकबाजांचे राष्ट्रीय पातळीवरील फसवणूकीचे रॅकेट उघडकीस आले आहे. उद्योगपती असल्याचे भासवून त्यांनी विविध राज्यांत अनेकांना गंडा घातला आहे. नागपुरातील दोन फसवणूकीच्या प्रकरणांमुळे त्यांचे बिंग उघड झाले. त्यांनी एकाला युरोपमध्ये बॅंकेत नोकरी लावून देतो असे सांगत ५० लाखांची फसवणूक केली, तर सॉफ्ट लोनच्या नावाखाली एकाकडून ७२ लाख रुपये उकळले. दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली असून आर्थिक गुन्हे शाखा त्यांची चौकशी करत आहे.
आशिकअली नाथानी मोहीबअली नाथानी (७३, पनवेल) व हसन अहमद शेख (६२, पनवेल) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांविरोधातही नागपुरातील सिताबर्डी व पाचपावली पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे नोंदविण्यात आले. पहिल्या प्रकरणात त्यांनी एका व्यक्तीला संपर्क केला व त्यांच्या मुलासाठी युरोपमधील सायप्रस येथील पॉईंट बॅंकेत नोकरी असल्याची माहिती दिली. दर महिन्याला भारतीय चलनात ४८ लाख रुपये पगार मिळेल असे आमिष दाखविले. फिर्यादी यासाठी तयार झाले व त्यांनी स्वत:सोबतच पत्नी, मुलाचे पासपोर्ट त्यांना दिले. आरोपींनी विविध प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली ५०.६५ लाख रुपये फिर्यादीकडून घेतले.
सानपाडा येथील आयसीआयसीआय बॅंकेच्या शाखेत ही रक्कम वळती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांनी नोकरीबाबत काहीच सांगितले नाही. फिर्यादीने वारंवार विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसेदेखील परत करण्यास ते तयार नव्हते. अखेर फिर्यादीने सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली व पोलिसांनी दोघांविरोधातही फसवणूकीचा गुन्हा नोंदविला. या प्रकरणाच्या तपासात दोन्ही आरोपींचे तपशील समोर आले व त्यांना पनवेलमधून अटक करण्यात आली. त्यांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीदरम्यान पाचपावलीतील गुन्हादेखील समोर आला.
संत्र्याचा बगिचा खरेदी करायला आले अन गंडवून गेले
आशिकअली व हसन हे दोघेही नागपुरात ३०० एकर संत्र्याचा बगिचा खरेदी करण्याच्या नावाखाली आले. त्यांनी ते ‘आरएस इन्व्हेस्टमेंट बॅंक ॲंड ट्रस्ट’चे चेअरमन असल्याची बतावणी केली. त्यांनी एका व्यक्तीला विश्वासात घेतले व तुम्हाला कमी व्याजदरात सॉफ्ट लोन मिळवून देऊ शकतो असे सांगितले. आमचे पैसे विदेशात असून ते आम्ही थेट भारतात गुंतवू शकत नाही. मात्र सॉफ्ट लोनच्या माध्यमातून तुम्हाला फंडिंग करू शकतो असेदेखील सांगितले. त्यानंतर अमेरिकेतील टॅक्सेशनच्या नावाखाली त्यांनी ७२ लाख रुपये उकळले. आरोपींनी फिर्यादीला १० मिलीयन डॉलर्सचे आरएस इन्व्हेस्टेमेंट बॅंक ॲंड ट्रस्टचे नाव असलेले डीडी दिले. मात्र ते डीडी अमेरिकेत क्लिअर होऊ शकले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीला लक्षात आले. त्यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
अनेक राज्यांमध्ये जाळे
दोन्ही आरोपी हे सराईत ठकबाज असून त्यांनी उद्योगपती असल्याचे सांगत विविध राज्यातील धनाढ्यांना गंडा घातला आहे. या आरोपींनी नागपूर व विदर्भात आणखी व्यापाऱ्यांचीदेखील फसवणूक केल्याची शक्यता असून असे कुणी असल्यास त्यांनी लगेच तक्रार करावी, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी केले आहे.