लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड जग्गू ऊर्फ जगदीश कोसुरकर (वय ३५, रा. गरोबा मैदान) आणि त्याच्या साथीदारांनी ५० लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुल तसेच चाकूचा धाक दाखवून एका बुकीला मारहाण केली. त्याच्या गळ्यातील सोन्याची दीड लाखाची साखळीही हिसकावून नेली. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास छापरूनगर चौकाजवळ ही घटना घडली. यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.लकडगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय ऊर्फ चिंटू जवाहरलाल चूग (वय ३५, रा. क्वेट्टा कॉलनी) बारदाण्याचा जोडधंदा करतो. तो पोलिसांच्या रेकॉर्डवर बुकी म्हणून ओळखला जातो. चिंटू चुग आणि त्याचे मित्र गुरुवारी एका बुकीच्या अंत्ययात्रेत गेले होते. तेथे कुख्यात कोसुरकर याच्या टोळीतील आरोपी अमर शर्मा आणि रंगा या दोघांनी चिंटू चूगला जग्गू भाईने तुला ५० लाखांची खंडणी मागितली होती. त्याचे काय झाले, अशी विचारणा केली. यावेळी चिंटूने त्याला भाई होंगा तेरा, मेरा नही असे म्हटले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. अंत्यसंस्कारानंतर चिंटू त्याच्या मित्रांसोबत छापरूनगर चौकातील स्वस्तिक अपार्टमेंटजवळ आले. ते तेथे गप्पा करीत असताना दुपारी ३ च्या सुमारास कुख्यात कोसुरकर, शर्मा आणि रंगा बीएमडब्ल्यू कारने तेथे आले. त्यांच्यामागे चार ते पाच मोटरसायकलवर ८ ते १० आरोपी आले. आरोपी कोसुरकर आणि रंगाने चाकू काढले तर शर्माने पिस्तूल काढून चिंटूवर धाव घेतली. अन्य काही आरोपींनी दगड हातात घेऊन चिंटूला मारहाण केली. चिंटूच्या मित्रांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर आरोपींनी चिंटूच्या गळ्यातील दीड लाखांची सोनसाखळी हिसकावून त्याला धमकी देत आरोपी पळून गेले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. त्यानंतर चिंटू आणि त्याच्या मित्रांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधाशोध केली. मात्र, शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाही.
नागपुरात पिस्तुलाच्या धाकावर बुकीला मागितली ५० लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 10:22 AM
कुख्यात गुंड जग्गू ऊर्फ जगदीश कोसुरकर (वय ३५, रा. गरोबा मैदान) आणि त्याच्या साथीदारांनी ५० लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुल तसेच चाकूचा धाक दाखवून एका बुकीला मारहाण केली.
ठळक मुद्देमारहाण करून सोनसाखळी हिसकावून नेलीकुख्यात कोसुरकर टोळीचे कृत्यलकडगंजमध्ये गुन्हा दाखल