५० टक्के गुणाचा पात्रता निकष रद्द : हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:00 PM2019-08-28T22:00:15+5:302019-08-28T22:01:45+5:30
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्के व त्यावर गुण मिळविलेल्या उमेदवारांनाच इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या शिक्षकपदी नियुक्ती देण्याचा राज्य सरकारचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्के व त्यावर गुण मिळविलेल्या उमेदवारांनाच इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या शिक्षकपदी नियुक्ती देण्याचा राज्य सरकारचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला. त्यामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न असलेल्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्य सरकारने ७ फेब्रुवारी २०१९ रोजी संबंधित वादग्रस्त निर्णय जारी केला होता. त्याविरुद्ध सचिन सुरवाडे व इतर उमेदवारांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. वादग्रस्त निर्णय अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांची याचिका मंजूर झाली. याचिकाकर्त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जुन्या नियमानुसार ते इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या शिक्षकपदासाठी पात्र आहेत. परंतु, नवीन पात्रता निकषामुळे त्यांच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले होते. तसेच, त्यांना विविध ठिकाणी झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्यासारख्या हजारो उमेदवारांचा शिक्षक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.