संस्कृत विद्यापीठ : विद्यार्थ्यांच्या मते नवीन परीक्षा शुल्क अन्यायकारक रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने बीए प्रशासकीय सेवा अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात २०१४ ते २०१७ या काळात तिप्पटीपेक्षा अधिक वाढ केली. याला विद्यार्थ्यांनी प्रखर विरोध दर्शविला. हा विरोध लक्षात घेत विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा अर्थात १,५०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेत तसेच परिपत्रक जारी केले. दुसरीकडे, नवीन परीक्षा शुल्कदेखील २०१४ मधील शुल्काच्या ६७ टक्के अधिक असून, ते इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुल्कापेक्षा अधिक असल्याने अन्यायकारक आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आणि प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे बी.ए. (व्यावसायिक), बी.ए. (वेदांग ज्योतिष), बी.ए. (योगशास्त्र ) तसेच बी.ए. (प्रशासकीय सेवा ) अभ्यासक्रम घेतले जातात. बी.ए. (प्रशासकीय सेवा ) अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क २०१४ मध्ये ३०० रुपये होते. २०१५ मध्ये ५०० रुपये व २०१६ मध्ये हे शुल्क १,५०० रुपये करण्यात आले. परिणामी, तीन वर्षांत तिपटीपेक्षा अधिक वाढ करण्यात आली. दुसरीकडे याच विद्यापीठात २०१४ ते २०१६ या काळात बी.ए. (व्यावसायिक), बी.ए. (वेदांग ज्योतिष) व बी. ए. (योगशास्त्र) या अभ्यासक्रमांचे परीक्षा शुल्क ४०० रुपये होते. परिणामी, विद्यार्थ्यांनी या शुल्कवाढीला प्रखर विरोध दर्शवित विद्यापीठावर मोर्चा नेला होता. त्यामुळे प्रशासनाने बी.ए. (प्रशासकीय सेवा) आणि बीएड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आणि तसे शनिवारी (दि. २५) परिपत्रकाद्वारे जाहीर केले. परंतु, हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे विद्यापीठाला कळविले. इतर अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क ४०० रुपये असताना कपात केलेले शुल्क हे २०१४ च्या तुलनेत ६७ टक्के असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही वाढ अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
परीक्षा शुल्कात ५० टक्के कपात
By admin | Published: February 26, 2017 3:03 AM