लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. विदेशी विद्यापीठातील परीक्षांच्या तयारीसाठी देशात अनेक खासगी संस्थाही आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे अशा गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना ही संधी गमवावी लागते. परंतु आता अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे.विदेशात विविध विषयांमध्ये उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. विदेशातील नमांकित विद्यापीठे यासाठी प्रवेशपरीक्षा घेत असतात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो. यानंतर त्या-त्या विद्यापीठांतर्फे शिष्यवृत्तीही दिल्या जातात. यासाठी भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अर्ज करीत असतात. विदेशातील विद्यापीठांच्या प्रवेशासाठी ‘जीआरई ’व ‘टफेल’ यासारख्या प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा अतिशय कठीण असतात. त्यामुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणावर असते. या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी देशात अनेक खासगी प्रशिक्षण संस्थासुद्धा कार्यरत आहेत. परंतु त्यांचे शुल्क हे लाखात असते. किमान अडीच ते तीन लाख रुपयांचे पॅकेज या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था घेत असतात. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये प्रवेश घेणे शक्य नसते. त्यामुळे ते स्वत:च्या ताकदीवर अभ्यास करीत असतात. यातून ही मुलं ही परीक्षा उत्तीर्णही करतात, परंतु त्यानंतरही खर्चाचा प्रश्न कायम राहतोच. त्यामुळे कितीही गुणवत्ता असली तरी मागासवर्गीय विद्यार्थी यात मागे पडतात. ही बाब लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने पुढाकार घेत अशा विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागातर्फे राज्यस्तरावर स्वत:ची आॅनलाईन परीक्षा घेतली. या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातून संपूर्ण महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. यात २४ मुली व २६ मुलं आहेत. सध्या या मुलांना नागपुरात दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. विदेशातील विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया परीक्षेची तयारी त्यांच्याकडून करवून घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ कन्सलटन्सीची नेमणूकही झाली आहे. प्रशिक्षणासोबतच त्यांच्या राहण्या-खाण्याचा संपूर्ण खर्चही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे केला जात आहे, हे विशेष.अभिनव उपक्रमशासनाने एक चांगला व अभिनव उपक्रम सुरूकेला आहे. या विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षण व राहण्या-खाण्याचीच सुविधा नव्हे तर त्यांना संपूर्ण साहित्यसुद्धा पुरविले जात आहेत. तसेच या विद्यार्थ्यांमधून ज्यांची निवड विदेशातील विद्यापीठात होईल, त्यांच्या कन्सलटन्सीचे कामही प्रतिष्ठानच सांभाळणार आहे. विद्यार्थ्यांला प्रवेशापासून तर विदेशात पाठवण्यापर्यंत सर्व काही प्रतिष्ठान करणार आहे.डॉ. सिद्धार्थ गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान मुख्य समन्वयक व प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण