लोकमत विशेषयोग्यता प्रमाणपत्राशिवाय धावतात वाहने : जीवाशी खेळण्याचा सर्रास प्रकारसुमेध वाघमारे नागपूरजुनाट व कालबाह्य झालेल्या वाहनांना रंगरंगोटी करून ती वाहने वाहतुकीसाठी वापरात आणून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार नागपुरात सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे, शहरातील ट्रक, टँकर, कचरा उचलणारी वाहने, ट्रेलर, बस, आॅटोरिक्षा, सहासीटर आदी प्रकारच्या सुमारे ५० हजाराच्यावर वाहनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वार्षिक तपासणी (पासिंग) करून घेऊन योग्यता प्रमाणपत्र घेतले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. चौकाचौकात उभे राहणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून व आरटीओकडून कारवाई होत नसल्याने ही धोकादायक वाहने अपघाताला आमंत्रण देत आहे.गेल्या १० वर्षांत नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनी वाढली आहे. याच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये शहरात वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती, मागील वर्षापर्यंत ही संख्या पावणेतेरा लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर आता १४ लाख ३८ हजारांवर गेली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी या खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेऊन चालणाऱ्या ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटोरिक्षा या वाहनांची संख्या १ लाख ५० हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे ५० हजार वाहनांनी पासिंगच केले नसल्याची बाब उजेडात आली आहे. यामुळे वाहनांचा ब्रेक फेल होणे, टायर फुटणे, अचानक इंजिनमधील बिघाड होऊन रस्त्याच्या मधोमध वाहन थांबणे, आदी प्रकारांमुळे अपघातांची व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेतलेल्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना दिलेली वाहने दिवस-रात्र सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे ही वाहने सुस्थितीत आहेत की नाही, याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. पासिंग संपताच मिळते नोटीसपासिंग संपलेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयाकडून नोटीस पाठविले जाते. त्यानंतरही कोणी पासिंग करवून घेत नसेल तर आॅटोला वर्षाला १० हजार रुपयांपर्यंतचा दंड तर इतर वाहनांसाठी १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत दंड आहे. याशिवाय आरटीओच्या वायू पथकांकडून वेळोवेळी रस्त्यावर वाहनांची तपासणी करून वाहने तपासली जातात. -विजय चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर
५० हजारांवर धोकादायक वाहने रस्त्यावर
By admin | Published: August 31, 2015 2:38 AM