नागपूर : नागपूर शहर व जिल्ह्यातील गरीब व गरजू लोकांसाठी ५० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. याकरिता योजना तयार करून जागेचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत दिले.अशी राहील योजना ही गृहयोजना मध्यमवर्गीय लोकांसाठी राबविता येणार आहे. पाच लाख रुपये किमतीची घरे राहतील. ती १५ वर्षांच्या दरमहा दोन हजार रुपये हप्त्यांतर्गत देण्यात येतील. नागपूर स्थानिक आधारकार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येईल. नागपूर येथे घर अथवा जागा नसेल त्यांनाच घरे देण्यात येतील. खोटी माहिती देऊन घर ताब्यात घेतल्यास ते जप्त करण्यात येईल. केंद्र शासन, राज्य शासन व महानगरपालिका यांच्या समन्वयाने ही गृहयोजना राबविण्यात येईल, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. यावेळी कमी दरात उच्च प्रतिच्या बांधण्यात येणाऱ्या घरांचे वेगवेगळ्या कंत्राटदारांनी सादरीकरण केले. नागपूर येथील झोपडपट्टीचा प्रश्न सोडविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरे बांधण्यात येतील. या संदर्भात दोन आठवड्यात योजना सादर करावी, असे निर्देशही गडकरी यांनी दिले. या बैठकीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर देशमुख, आमदार समीर मेघे, स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)मॉडेल मिल चाळ धारकांच्या प्रलंबित प्रश्नांंवर चाळवासीयांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यांचे निवेदन घेऊन महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना मॉडेल मिल चाळधारकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. नागपूर शहर व ग्रामीण क्षेत्रातील रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर मध्य रेल्वेचे डीआरएम ओ.पी. सिंह आणि दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे विभागाचे डीआरएम कन्सल यांच्यासोबत चर्चा केली. रेल्वे विभागाचे प्रलंबित कार्य व समस्या यांवर त्वरित तोडगा काढून समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.मोमीनपुरा ते कडबी चौक रस्त्यावरील रेल्वे पुलाची दुर्दशा, गोधनी व अजनी स्टेशन येथील सुविधा व सौंदर्यीकरण यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. ही कामे खासदार विकास निधीतून तातडीने करावी, असे निर्देश दिले.
गरिबांसाठी ५० हजार घरे
By admin | Published: August 18, 2015 3:38 AM