मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पंतप्रधान घरकूल योजनेचे भूमिपूजन नागपूर : राज्य सरकारला समाजातील प्रत्येक घटक, वर्गाची चिंता आहे. अंतिम घटकापर्यंत विकासाला पोहोचविण्याचे सरकारचे ध्येय आहे. पंतप्रधान घरकूल योजनेत दोन लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. नागपूर शहरात बेघर कुटुंबांना २०१९ पर्यंत ५० हजार पक्की घरे देणार येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे गुरू गोविंद सिंग मैदान, वांजरी रिंग रोड येथे पंतप्रधान घरकूल योजना आणि मलजल प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन रविवारी पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. समारंभात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रविण दटके, आ. अनिल सोले, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, नासुप्र विश्वस्त बंडू राऊत, नगरविकास (२) सचिव मनिषा म्हैसकर, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. (प्रतिनिधी) असंघटित मजूरांना घर देण्याची योजना मुख्यमंत्री म्हणाले, सरकार जाती, धर्म, पंथ न पाहता गरिबांच्या हितासाठी काम करीत आहे. प्रत्येक बेघरांना घर देणार आहे. तसेच असंघटित मजूरांना घर देण्याची योजना तयार करण्यात येत आहे. पोलिसांनाही योजनेत सहभागी करण्यात येईल. पुढील पाच वर्षांत उत्तर नागपुरात होणाऱ्या विकासामुळे हा भाग शहराच्या विकसित क्षेत्रात सहभागी होईल. प्रास्तविक आ. मिलिंद माने यांनी केले. वेकोलि व नासुप्र दरम्यान झालेल्या करारादरम्यान वेकोलिचे संचालक (कार्मिक) डॉ. संजय कुमार, संचालक (तांत्रिक) टी.एन. झाआणि नासुप्रचे अभियंता अधीक्षक आर.के. पिंपळे उपस्थित होते. कॅशलेस यंत्रणा गरिबांच्या हिताची मुख्यमंत्री म्हणाले, कॅशलेस यंत्रणा गरिबांच्या हितासाठी आहे. या यंत्रणेत गरिबांच्या किमान वेतनात कंत्राटदार वा कंपनीला कपात करता येणार नाही. त्यांच्या खात्यात येणारे वेतन तंतोतंत राहील. जर कुणी मजदूरांच्या हक्कावर आघात करीत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. भीम अॅप लोकांसाठी फायद्याचा आहे. तीन लाख रुपयांत मिळणार घर : नितीन गडकरी नितीन गडकरी म्हणाले, पंतप्रधान घरकुल योजनेत फूटपाथवर भीक मागणारासुद्धा घर खरेदी करू शकेल, अशी व्यवस्था असल्याची सूचना योजनेचा प्रस्ताव करीत असताना सदस्य या नात्याने दिला आहे. चीन, फ्रान्स, अमेरिका तंत्रज्ञानावर आधारित टिकाऊ स्वस्त घर बनवून देण्यास तयार आहे. नागपूरकरांना तीन लाख रुपयांत घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. योजनेत लोकाजवळ जमीन वा घर नसावे, अशी अट आहे. चुकीच्या मार्गाने घर घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याची संपत्ती जप्त होऊ शकते. अधिकाऱ्यांनी लक्ष्मीदर्शनपासून दूर राहावे गडकरी यांनी नासुप्रला आपल्या कार्यप्रणाली सुधारणा करण्याचा आणि अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक व्यवस्था असावी, असे मुख्यमंत्री आणि माझे मत आहे. कुणी अधिकारी लक्ष्मीदर्शनाविना काम करण्यास नकार देत असेल तर त्याच्यावर बुलडोझर चालवू. नागपूर शहरात ३२ हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. केंद्र, राज्य व मनपात भाजपाची सत्ता आहे. पुन्हा एकदा भाजपाला पूर्ण बहुमताने निवडून आणावे. १५१ पैकी १२५ जागा जिंकू, असा विश्वास आहे. भाजपा जाती-धर्माचे राजकारण करीत नाही गडकरी म्हणाले, भाजपा जाती-धर्माचे राजकारण करीत नाही. राज्य सरकारने प्रत्येक वर्ग, धर्म, जातीच्या लोकांना मदत केली आहे. गरीबांचा विकास पहिली प्राथमिकता आहे. नागपुरात सिमेंटचे रस्ते बनत आहे. २०० वर्षांपर्यंत एकसुद्धा खड्डा पडणार नाही. मी आणि मुख्यमंत्री शहराला प्रगतीच्या मार्गावर नेत आहे.
नागपुरात ५० हजार लोकांना घर देणार
By admin | Published: January 02, 2017 2:10 AM