मंगेश व्यवहारे
नागपूर : हिंदू धर्मामध्ये शंखाचे विशेष स्थान आहे. अनेकांच्या घरी मंदिरात शंखाचे पूजन होते, मंगलकार्यामध्ये शंखनाद होतो. धार्मिक महत्त्व असलेला शंखसुद्धा एक वाद्य आहे. या वाद्याचे जेव्हा समूहाने वादन होते, त्यातून जो नादध्वनी निघतो त्याने आसमंत निनादून जातो. याची अनुभूती येत्या श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत अनुभवायला मिळणार आहे. पांचजन्य श्रीराम सेवक शंखदलाचे ५०० सदस्य समूहाने शंखनाद करणार आहेत.
पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेसाठी गेल्या दीड महिन्यापासून शंखदलाचा गाडीखान्याच्या मैदानात सराव सुरू आहे. १२ वर्षांच्या मुलापासून ५८ वर्षे वयाची व्यक्ती, विद्यार्थ्यापासून इंजिनिअर, डॉक्टर, व्यावसायिक या शंखदलात सहभागी आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही सदस्य येथे सहभागी होतात. सायंकाळी ७ नंतर सरावादरम्यान संपूर्ण गाडीखाना परिसर शंखनादाने दरवळतो. या शंखदलाचे प्रमुख सूरज घुमारे हे आहे. ते नियमित शंख वाजवितात. शोभायात्रेत श्रीरामाचा रथ ओढतात. सूरज घुमारे, नतिकेश वानकर, सूरज अरमरकर, दिलीप आगाशे यांना पोद्दारेश्वर राम मंदिराच्या प्रमुखांनी प्रेरणा दिली. ७ वर्षांपूर्वी शंखदल तयार झाला. ५० मुलांचा हा दल आता ५०० सदस्यांचा झाला आहे. पांढरा गणवेश आणि भगवा फेटा या पेहराव्यात शोभायात्रेत श्रीरामाच्या रथापुढे हे दल वादन करताना दिसणार आहेत.
नियमित शंख वाजविणाऱ्या एकालाही कोरोना झाला नाही
शंख वाजविणे ही एक कला आहे. ओठ आणि फुंकर याच्या साह्याने शंखातून ध्वनी निघतो. ज्यांना शंख वाजविता येत नाही, त्यांच्याकडून १ महिन्याचा सराव केला जातो. हा प्राणायाम व मेडिटेशनचा भाग आहे. शंख वाजविल्यामुळे श्वासांवर नियंत्रण मिळविता येते. शंख वाजविल्यामुळे फुप्फुस बळकट होते. आमच्या दलातील नियमित शंख वाजविणाऱ्या एकालाही कोरोना झाला नाही, असा दावा या दलाच्या प्रमुखांचा आहे.
शंखातून ८ प्रकारच्या रचना
शंख हे वाद्य आहे. शोभायात्रेतच हा शंखदल सादरीकरण करतो. हे सादरीकरण उत्कृष्ट व्हावे म्हणून त्यांनी शंखातून ८ प्रकारच्या रचना तयार केल्या आहेत. समूह शंखनादात या रचना कर्णपटलावर पडताच रोमांच निर्माण होतो.
- वर्षातून आमचे एकदाच सादरीकरण होते. वादन सुंदर आणि आकर्षक व्हावे म्हणून दीड महिन्याचा सराव आम्ही करवून घेतो. अनेक युवक दलाशी जुळत आहेत. शंखवादन नियमित केल्यास युवकांचे व्यक्तिमत्व आणि शरीरही उत्तर होते. आमचे हे दल भारतातील एकमेव शंखदल आहे.
- सूरज घुमारे, संस्थापक, पांचजन्य श्रीराम सेवक शंखदल