लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील इव्हेंट उद्योग मध्य भारतात प्रसिद्ध आहे. काही वर्षांपासून लग्नसमारंभ, वाढदिवस, कॉर्पोरेट व केंद्र व राज्य शासनाचे कार्यक्रम, प्रदर्शन, गरबा, दुचाकी व चारचाकी गाड्यांचे लॉन्चिंग याशिवाय अन्य कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजर महत्त्वाचा ठरतो आहे. सर्व कार्यक्रम वर्षभर होतात, पण मार्च, २०२० पासून सर्वच कार्यक्रम मर्यादित वेळेत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होत असल्याने, इव्हेंट मॅनेजरची गरज भासत नाही. त्यामुळे नागपुरातील इव्हेंट उद्योग आणि त्याच्याशी जुळलेल्या ७० वेंडरचे वर्षभरात ५०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वच इव्हेंट मॅनेजरची कंबर मोडली आहे. सर्वच कार्यक्रम आणि लग्नकार्यही बंद आहेत. आता लग्नकार्यही २५ जणांच्या उपस्थितीत घरीच होत आहेत. मॉलमध्येही इव्हेंट बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायाशी जुळलेल्या २० हजार लोकांचा रोजगार बुडाला आहे. काम नसल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे.
इव्हेंट मॅनेजर म्हणाले, विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बाजारपेठांमध्ये एकाच वेळी शेकडो, हजारोंची गर्दी पाहायला मिळते. अशा वेळी प्रशासनाला कार्यक्रमाच्या आयोजनला परवानगी देण्यास हरकत नाही. सर्व वस्तू सॅनिटाइज्ड करून आणू. गेल्या वर्षीचा सिझन वाया गेला. पावसाळ्यानंतर नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात ५० जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य झाले, पण त्याकरिता लोकांना इव्हेंट मॅनेजरची गरज भासली नाही. शासकीय कार्यक्रम आणि प्रचाराची कामे इव्हेंट मॅनेजरला द्यावीत, असे निवेदन इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशनने शासनाला दिले आहे, पण शासनानेही याकडे पाठ फिरविली आहे. कर्मचाऱ्यांना थोडे-फार वेतन देता येईल, अशी कामे शासनाने द्यावीत, अशी मागणी आहे.
मध्य भारतातील राज्यांमध्येही लॉकडाऊन असल्याने नागपुरातील इव्हेंट मॅनेजरला त्या ठिकाणी आयोजनासाठी जाता येत नाही. त्यामुळे सर्वांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. या वर्षीही संपूर्ण सिझन गेला आहे. पावसाळ्यानंतर जे कार्यक्रम होतील, त्यांची कामे मिळतील, याची गॅरंटी नाही. कोरोनाचा परिणाम पुढे वर्षभर राहणार असल्याने काम मिळण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे बँकांचे कर्ज आणि व्याजाचे हप्ते वाढत आहेत. सर्व बाजूने हा उद्योग संकटात असल्याचे इव्हेंट मॅनेजरने सांगितले.
वर्षभर कामाची गॅरंटी नाही
मार्च, २०२० पासून लहानमोठे इव्हेंटचे आयोजन बंद आहे. या वर्षीही अशीच स्थिती आहे. पुढे वर्षभर कामाची गॅरंटी नाही. त्यामुळे सर्वांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत थोडे-फार कामे मिळाली. आता कामगारांना वेतन देणे शक्य नाही. त्यांचा रोजगार बुडाला आहे.
प्रमोद बत्रा, अॅडमार्क इव्हेंट.
शासनाने उपक्रमाद्वारे मदत करावी
खासगी कामे बंद असल्याने शासनाने आपल्या उपक्रमांद्वारे इव्हेंट उद्योगाला मदत करावी. या संदर्भात शासनाला असोसिएशनतर्फे निवेदन दिले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या उद्योगांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. या उद्योगाशी जुळलेल्या वेंडर व कामगारांना फटका बसला आहे.
विशेष अग्रवाल, विशेष वेडिंग कंपनी.