मोरेश्वर मानापुरे, नागपूर : दसरा ते दिवाळीदरम्यान नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत जवळपास ५०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती आहे. लोकांनी आवडीच्या उत्पादनांची मनमुराद खरेदी केली. प्रीमियम एलएडी, वॉशिंग मशीन, फ्रिज, होम थिएटर, एसी, लॅपटॉप, मोबाईल खरेदीवर लोकांचा जास्त भर होता. शून्य टक्के व्याजदर आणि कंपन्यांच्या विविध योजनांमुळे यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रीमियम उत्पादनांना जास्त मागणी
नागपुरात ३५० हून अधिक शोरूम असून ५५ ते ८५ इंच आकारातील एलईडी, दोन दरवाज्याचे मोठे फ्रिज, अद्ययावत वॉशिंग मशीन, स्मार्ट वॉच जास्त विकले गेले. मागणीच्या तुलनेत कंपन्यांकडून उत्पादनाचा पुरवठा कमी होता. त्यामुळे अनेकांनी बुकिंग केले. कंपनीकडून माल आल्यानंतर पुरवठा करण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
फायनान्समुळे विक्री वाढली
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काही फायनान्स कंपन्यांची आणखी भर पडली आहे. त्यामुळेच विक्रीत अचानक वाढ झाली आहे. ९० टक्के ग्राहक शून्य टक्के व्याजदरात फायनान्स करूनच उपकरणे खरेदी करतात. शिवाय कंपन्यांच्या कॅश बॅक आणि वाढीव वारंटीचा फायदा घेतात. काही कंपन्यांनी दाखल केलेल्या फायनान्सवरील गिफ्ट व्हाऊचर योजनेचा फायदा घेतला. या योजनेतही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. फायनान्स कंपन्यांमुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे भलं झाल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.
-------
फायनान्समुळे विक्री वाढली
फायनान्स आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या विविध योजनांमुळे विक्रीत वाढ झाली आहे. यंदा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रीमियम उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.-पारूल मित्तल, मित्तल इलेक्ट्रॉनिक्स
-------
हायएन्ड वस्तूंना जास्त मागणी
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. नवीन हायएन्ड टीव्हीला जास्त मागणी होती. शोरूमचा सर्व्हिसवर भर असल्याने उत्तम प्रतिसाद आहे. पंचमीपर्यंत गर्दी राहील.-गौरव पाहवा, लोटस मार्केटिंग
-------
विक्रीचा आलेख उंचावला
यंदा दिवाळीत विक्रीचा आलेख उंचावला आहे. लोक कुटुंबीयांसह खरेदीसाठी येत आहेत. पंचमीपर्यंत व्यवसाय राहील. फर्म १९४६ ला स्थापन झाली असून तिसरी पिढी कार्यरत आहे.-संतोष टावरी, टावरी मार्केटिंग
-------
अपेक्षेहून जास्त प्रतिसाद
यंदा दिवाळीत अपेक्षेपेक्षा जास्त विक्री झाली. सर्व वर्गातील लोकांनी मनसोक्त खरेदी केली. मोठ्या उत्पादनांना मागणी वाढली असून शून्य टक्के व्याजदरामुळे विक्रीत भर पडली.-श्रीकांत भांडारकर, श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स
-------
दिवाळीत विक्रीत वाढ
यंदा दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ झाली. लोकांनी फायनान्स कंपन्यांचा फायदा घेत खरेदी केली. मार्केट दरवर्षी वाढत असून शोरूमला चांगला प्रतिसाद मिळत आहे.-जीवन शिवनानी, फेअरडील इलेक्ट्रॉनिक्स
-------
प्रीमियम वस्तूंची विक्री वाढली
यंदा सणांमध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी प्रीमियम वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पंचमीपर्यंत व्यवसाय राहील. फायनान्स कंपन्यांचा फायदा मिळत आहे.-राजेश गडेकर, अपेक्षा इलेक्ट्रॉनिक्स.