जिल्हाधिकारी सचिन कुर्वे : आॅनलाईन अर्ज स्वीकारणारनागपूर : मागेल त्याला विहीर या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यात ५०० सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम राबविण्यात येत असून यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध असून (आपले सरकार. महाराष्ट्र.गव्ह.इन) या वेबसाईटवर १५ आॅक्टोबरपासून सुविधा उपलब्ध आहे. आपले सरकार पोर्टलवर मागेल त्याला शेततळे येथे क्लिक करून मागेल त्याला विहीर येथे क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्या नावाची नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर सिंचन विहिरीसाठी अर्ज येथे क्लिक केल्यानंतर दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात माहिती भरावयाची आहे. अर्जासोबत आवश्यक दस्ताऐवज अपलोड करणे आवश्यक असून यासाठी २० रुपये सेवा शुल्क लागू राहील.मागेल त्याला विहीर या उपक्रमांतर्गत शेतकऱ्याकडे त्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी. यासाठी कमाल मर्यादा नाही. लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे, भातकचरा सोबत बोडी व विहीर या घटकाचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा. दोन अथवा तीन लाभार्थ्यांनी त्यांची जमीन सलग असल्यास सामुदायिक विहिरीची मागणी केली तर ते सामुदायिकरीत्या विहीर मिळण्यास पात्र असतील. यासाठी पाण्याचा वापर व पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १०० रुपये स्टॅम्प पेपरवर करार आवश्यक आहे.शेतकरी कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्याचे वारसदार, दारिद्र्य रेषेखालील बीपीएल शेतकरी व इतर लाभार्थी या योजनेसाठी प्राथमिकते नुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठी ५०० सिंचन विहिरींची योजना
By admin | Published: October 20, 2016 3:14 AM