शरद मिरे लोकमत न्यूज नेटवर्कभिवापूर : नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यापासून भिवापूरला शहरीकरणाचा लूक येत आहे. यातच घटना आणि दुर्घटनाही वाढत आहे. अशात नगरपंचायतीकडे उपलब्ध असलेले पाचशे लिटर क्षमतेचे अग्निशामक वाहन आगीवर नियंत्रण कसे मिळवणार? कारण मागील चार महिन्यांत शहरात घडलेल्या दोन्ही घटनेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात हे अग्निशामक वाहन पूर्णतः फेल ठरले आहे.
शुक्रवारी (दि.२९) शहरातील धर्मापूर पेठेतील गोदामाला लागलेल्या आगीच्या घटनेत ५०० नग बारदान्यासह इतर साहित्य जळून खाक झाले. माहिती मिळताच नगरपंचायतीच्या अर्धा डझन अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची भीषणता आणि अग्निशामक वाहनाची क्षमता याचा कुठेच ताळमेळ जुळत नव्हता. अखेरीस स्थानिकांनी एक पाऊल पुढे येत, घरगुती साहित्याच्या माध्यमातून पाण्याचा मारा करीत, आगीवर नियंत्रण मिळविले. केवळ पाचशे लिटर क्षमता असल्यामुळे अग्निशामक वाहनाची टैंक काही वेळातच खाली होत होती. त्यामुळे शेवटी घटनास्थळावरील बोअरवेलचे पाणी अग्निशामक वाहनासाठी सलग वापरावे लागले. गत चार महिन्यांपूर्वी राष्ट्रीय मार्गावरील मुख्य बाजारपेठेतील चाळीमध्ये एका मोबाइलच्या दुकानाला रात्रीच्या सुमारास आग लागली. यावेळी चाळीतील २० ते २५ दुकाने आगीच्या तावडीत सापडतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
नगरपंचायतीची तोकडी अग्निशामक सेवा फेल ठरल्याने अखेरीस उमरेड आणि पवनी (जि.भंडारा) येथून दोन मोठ्या अग्निशामक वाहनांना पाचारण करण्यात आले. आगीच्या दोन्ही घटनेत नगरपंचायतीच्या अग्निशामक वाहनाचा कटू अनुभव लक्षात घेता, पाचशे लिटर क्षमतेचे वाहन खरच शहरातील आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळवू शकते काय, हा प्रश्नच आहे.
प्रभावी अग्निशामक सेवा उभी करासध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातच नव्हे तर तालुक्यात कधी कुठेही आगीच्या घटना घडू शकतात. अशावेळी पाचशे लिटर क्षमतेच्या अग्निशामक वाहनाच्या बळावर आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने शहरात प्रभावी अग्निशामक व्यवस्था उभी करावी अशी मागणी प्रमोद रघुशे, कैलास कोमरेल्लीवार, जयप्रकाश बोराडे, हिमांशू अग्रवाल, अभय ठवकर, राकेश पौनीकर, अमोल वारजुरकर, सोहेल हटवार आदींनी केली आहे.
प्रशिक्षणाविनाच निघाले आगीशी दोन हात करायला?अग्निशामक सेवा बळकटीकरण योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०२४ मध्ये भिवापूर नगरपंचायतीला पाचशे लिटर क्षमतेचे अग्निशामक वाहन मिळाले. मात्र आग कधी कुठेही लागू शकते, त्यासाठी २४ तास उपलब्ध अशी स्वतंत्र प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळाची व्यवस्था उभी करण्यात आली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीचे चालक आणि नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी अग्निशामक वाहनाची जबाबदारी सांभाळतात.