नागपूर : तब्बल दोन वर्षांनंतर यंदा होळीचा गुलाल सर्वाधिक उधळला जाणार आहे. यंदा १७ मार्चला होलिका दहन आणि १८ मार्चला रंगपंचमी असल्यामुळे लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतील.
होळीला तीन दिवस उरले असून यानिमित्ताने बाजारपेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. इतवारी आणि रेशिम ओळीमध्ये पारंपरिक आणि हर्बल गुलाल, रंगासह पिचकारी, टोपी, मुखवटे आणि अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा नागपुरातून जवळपास ५०० टन गुलाल विक्रीची उत्पादकांना अपेक्षा आहे.
विविधरंगी गुलाल दीडपटीने महाग
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा युक्रेन युद्धामुळे विविधरंगी गुलाल आणि रंग महाग झाले आहेत. गुलाल तयार करण्यासाठी लागणारे आरारोट, रंग आणि ऑईल महागल्यामुळे यंदा गुलालाच्या किमती दीडपटीने वाढल्या आहेत. याशिवाय क्रूड ऑईलची किंमत वाढल्यामुळे प्लास्टिक दाणे महाग झाले आणि दाण्यांपासून तयार झालेल्या प्लास्टिकच्या पिचकारीसह अन्य वस्तूंच्या किमती दुपटीवर गेल्या आहेत. नेहमीप्रमाणेच स्पायडर मॅन, पबजी, गन्स, अप्पू टँक, पाईप आणि फुगे बाजारात असून जास्त किमतीत खरेदी करावे लागत आहेत. बाजारात पारंपरिकऐवजी खेळणी आणि कार्टुनच्या पिचकाऱ्या व गनला मागणी आहे. विविध प्रकारच्या पिचकाऱ्या ५० ते ८०० रुपयांपर्यंत, तर मुखवटे आणि टोप्या ५० ते २०० रुपयांपर्यंत विक्रीला आहेत.
यंदा नुकसान भरपाईची अपेक्षा
दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वस्तू विक्रीतून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. रंग आणि गुलाल ३० टक्क्यांनी महाग झाले आहेत. विविध कंपन्यांचे रंग १० ते ५० ग्रॅम पॅकिंगमध्ये आहेत. बाजारात रिटेल खरेदी सुरू झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
हर्बल गुलालाला सर्वाधिक मागणी
लोक आता आरोग्याप्रती सजग बनले आहेत. त्यामुळे पारंपरिक आणि हर्बल गुलालाला जास्त मागणी आहे. आदमने गृह उद्योगाचे राहुल आदमने म्हणाले, हर्बल गुलाल ३० टक्के महाग झाला आहे. निर्मितीसाठी लागणारा आरारोट २६ रुपयांवरून ४३ रुपये, रंग १२०० वरून १६०० रुपये, ऑईल ४५ वरून ७० रुपये आणि मजुरी ३०० वरून ५०० रुपयांपर्यंत वाढली आहे. किरकोळ बाजारात गुलाल १०० ते १५० रुपये किलो विकला जात आहे. यंदा कोरोनाच्या धास्तीमुळे १ मार्चपासून गुलाल निर्मिती सुरू केली. कोरोनाआधी १०० टन गुलालाचे उत्पादन करायचो. पण यंदा ५० टन गुलाल तयार होईल. यावर्षी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. नागपुरात निर्मित गुलाल संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात जातो.