नागपूर : दिवाळीतील आनंदाचे, उत्साहाचे प्रतीक म्हणजे फटाके. परंतु या फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्यांमध्ये अनार ६० टक्के, सुतळी बॉम्ब ३० टक्के, चक्री आणि रॉकेट १० टक्के व इतर फटाक्यात १० टक्के प्रमाण आहे, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी दिली. फटाक्यांमुळे होणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाख आहे. डॉ. मदान यांनी सांगितले, फटाक्यात चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात. या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना तसेच त्वचेला अपायकारक असतो. त्यामुळे दमा व अॅलर्जीचे प्रमाण वाढते. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डिग्रीपर्यंत वाढते. फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. यातील ६० टक्के व्यक्ती हे २० वर्षांखालील असतात. यात पुरुषांची संख्या ८० टक्के असते. फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना याची जास्त बाधा होते. कारण, स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला आणि इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यात जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा काढावा लागू शकतो. बारुदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते. (प्रतिनिधी)
फटाक्यांमुळे ५ हजारांवर लोकांना अंधत्व
By admin | Published: October 22, 2014 1:04 AM